छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना आता रेशन दुकानांमधून पुढील तीन महिने गहू आणि तांदळासोबत मकाही वितरित केली जाणार आहे. अंत्योदयच्या कार्डधारकांना प्रतिकार्ड दहा किलो या प्रमाणे मका दिली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेशनचे एकूण ५ लाख ३८ हजार लाभार्थी आहेत. तर स्वस्त धान्य दुकानांची संख्या ही १८०२ इतकी आहे. या स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीना दर महिन्याला धान्याचा मोफत पुरवठा होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ वितरित केले जातात. यावेळी स्वस्त धान्य दुकानांवर गहू, तांदळासोवत मकाही पुरविण्यात येणार आहे.
शहरातील १९९ दुकानांना आणि ग्रामीण भागातील सोळाशे दुकानांना गहू, तांदूळ आणि मकाही पुरवठा करण्यात येणार आहे. शासनाकडून हमी भावाने धान्य खरेदी केली जाते. त्या अन्नधान्य साठ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन रेशनवर कधी कोणते धान्य द्यायचे हे ठरविले जाते. त्यानुसार या महिन्यात मका वाटपाचा निर्णय घेतला गेल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
किती मिळणार धान्य ?
अंत्योदय लाभार्थीना प्रतिकार्डासाठी दर महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते. या ३५ किलोमध्ये पुढील तीन महिने १०-१० किलो प्रमाणे मका दिली जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थीना प्रतिलाभार्थी ५ किलो प्रमाणे धान्य मिळते. त्यात एक किलो मका वितरित केली जाणार आहे.