भारतीय संस्कृती आणि इतिहासातील प्रभू रामचंद्र हे नाव प्रत्येक हिंदूंच्या हृदयस्थानी आहे. रामायण आणि महाभारतातील कथा अजूनही घराघरात सांगितल्या जातात. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी १४ वर्ष वनवास पत्करला. या काळात महाराष्ट्रातील ५१ ठिकाणे अशी आहेत की, जिथे सीताहरण झाल्यानंतर लंकेकडे जाताना आणि परतताना प्रभूंचे वास्तव्य होते. वाल्मिकी रामायण, रामचरितमानस या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. प्रसिद्ध इतिहासकार डॉ. राम अवतार यांनी रामायणावर अभ्यास करून श्रीराम आणि सीता मातेच्या जीवनाशी निगडित देशातील २०० हून अधिक ठिकाणे शोधली आहेत.
रामटेक, रामगिरी, सालबर्डी, राळेगाव, उनकेश्वर या विदर्भातील ठिकाणाहून माहूर, जमदग्नी आश्रम येथे श्रीरामांचे वास्तव्य होते. त्यानंतर वाशिमजवळ असलेल्या रिठद येथे ते आले. रिठद येथे शिवाची (महादेव) व त्यांची भेट झाली. त्यासाठी शिवाला आपली मान वळवावी लागली. त्यामुळे येथे असलेल्या मंदिराचे नाव मुर्डेश्वर असून पिंड ही पूर्वाभिमुख आहे. पुढे यवतमाळ - नांदेड सीमेवर शरभंग ऋषींचा आश्रम होता. त्याठिकाणी शरभंग यांना कुष्ठरोगामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी बाणाचा उपयोग करून गरम पाण्याचे जल निर्माण केले, अशी आख्यायिका आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिराची स्थापना रामचंद्रांनी केल्याची आख्यायिका आहे.
जालन्याजवळ असलेल्या आकड येथे सीता न्हाणी आहे. डोंगरद-यात असलेल्या सेवली येथे श्रीरामाने शेतक-यांना नांगरणी शिकविली. त्यामुळे या भागातील शेतकरी शेती कामापूर्वी शिवमंदिरात पूजा करतात. तसेच लोणार येथे सीता न्हाणी, रामकुंड ही ठिकाणे राम - सीता असल्याची साक्ष देतात. सरोवराजवळ मंडकरणींचा आश्रम होता. तेथील कथा वनवासाशी निगडीत आहेत. लोणार येथे केवळ श्रीरामाची मूर्ती असणारे राम गया मंदिर आहे. सरोवराजवळ बाणांनी गौतमी गंगा प्रगट केली होती. तेथे राजा दशरथांचे श्राद्धही केले.
राक्षसभूवन हे शनीचे मोठे स्थान. पूर्वी हा दंडाकारण्याचा भाग असल्यामुळे अत्री, अगस्ती, दाक्षीची, पिपल्लाद, दक्षप्रजापती महर्षी गौतम आदी मान्यवर ऋषी याठिकाणी वास्तव्यास होते. याचस्थानी वनवासात असतांना प्रभू रामचंद्रांनी सीतामातेसह दत्त दर्शन झाल्याचा उल्लेख रामविजय ग्रंथात आढळतो. संपूर्ण वनवासात प्रभू रामचंद्र एकाच स्थानावर दोन वेळा येऊन गेले असे एकच ठिकाण येथे आहे. सीती हरणापुर्वी व सिता हरणानंतर शनी देवता स्थापनेवेळी अन्य कोणत्याही स्थानावर प्रभू रामचंद्र दोन वेळा गेलेले नाहीत.
रामायणात कायगाव टोक्याचे विशेष स्थान आहे. तेथील रामेश्वर मंदिर हे गोदावरी आणि प्रवरा नद्यांच्या संगमावर स्थित आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना भगवान श्रीरामांनी स्वहस्ते केल्याचे मानले जाते.
रामायणातील कथेनुसार, प्रभू रामचंद्रांनी कांचन मृगाचा पाठलाग करताना या स्थळी मृगाचा वध केला. म्हणूनच या ठिकाणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
(संदर्भ - Shriramvanyatra.org)