Accident News Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News: रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव पिकअपच्या धडकेत भावाचा दुर्दैवी अंत

Chhatrapati Sambhajinagar Accident: वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील भीषण अपघात, खंडाळा गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर: एकीकडे आज (दि.९) रक्षाबंधननिमित्त बहिणी भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे एका भावाची प्राणज्योत अपघातातच मालवली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एका भावावर काळाने घाला घातल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यात घडली आहे. वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या पिकअप ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

किरण सुदाम पेटारे (वय २५, रा. खंडाळा, ता. वैजापूर) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास महालगावजवळील पंचगंगा साखर कारखान्याजवळ हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे पेटारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, किरण पेटारे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होता. त्याचवेळी, वैजापूरच्या दिशेने एक पिकअप ट्रक (MH-20-EL-4999) भरधाव वेगाने येत होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या पिकअप ट्रकने समोरून येणाऱ्या किरणच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, किरण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर, बहिणीची प्रतीक्षा अधुरीच

रक्षाबंधनाच्या सणाचा आनंद क्षणार्धात दुःखात बदलला. ज्या भावाला राखी बांधून त्याच्या रक्षणाची कामना करायची, तोच भाऊ आता या जगात नाही, या कल्पनेने पेटारे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आपला भाऊ आता कधीच परत येणार नाही, या विचाराने कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे खंडाळा गावावर आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताने पेटारे कुटुंबाचा आधार आणि एका बहिणीचा भाऊ कायमचा हिरावून घेतला आहे, ज्याची पोकळी कधीही भरून न येणारी आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT