Crime News Pudhari file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime: आधी प्राधापकाची हत्या, मग आरोपीचा पोलीस ठाण्यातच वावर; संभाजीनगर पोलिसांच्या निष्काळजीपणा उघड

Rajabhau Londhe Case: प्रा. राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Professor Rajabhau Londhe Death Case

छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. हत्येनंतर संशयित म्हणून नातेवाइकांनी नाव देऊनही उस्मानपुरा पोलिसांना गुन्हा उघड करता आला नाही. विशेष म्हणजे, तब्बल महिनाभर आरोपी विशाल राठोड हा नातेवाइकांसमोरच पोलिस ठाण्यात वावरत होता. त्यामुळे या प्रकरणाकडे डोळेझाक करणाऱ्या उस्मानपुरा पोलिसांच्या कारभारावर नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, विशालने हत्येनंतर चुलत्याच्या घरात लपविलेले पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. मृतदेह पुरण्यासाठी मदत करणारा तिसरा साथीदार करण आडे याला न्यायालयात हजर केले असता त्याला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोड याच्या धूर्तपणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रा. लोंढे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यात मदतीसाठी धाव घेत होते.

धक्कादायक बाब म्हणजे, लोंढे यांची हत्या केल्यानंतर आरोपी विशाल राठोड हा चक्क त्यांच्या नातेवाइकांसोबत पोलिस ठाण्यात वावरत होता. मी त्यांना दोन दिवसांत शोधून आणतो, असे खोटे आश्वासन देत तो नातेवाईक आणि उस्मानपुरा पोलिस या दोघांचीही दिशाभूल करत होता.

या संपूर्ण प्रकरणात उस्मानपुरा पोलिसांचा निष्काळजीपणावर नातेवाईक संतप्त झाले. प्रा. लोंढे यांची बहीण सुमित्रा कांबळे यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासूनच विशाल राठोड आणि आकाश पवार यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मात्र उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी महिनाभर आमच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

कोणताही गुन्हा दाखल केला नाही. अखेर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केल्यानंतर सूत्रे हलली आणि अवघ्या ४८ तासांत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि हेतूवर त्यांनी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले.

नातेवाइकांचा संताप आणि मृतदेह घेण्यास नकार

सोमवारी प्रा. लोंढे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही, अशी ठाम भूमिका मृत प्रा. लोंढे यांचे बंधू उत्तम लोंढे आणि इतर नातेवाइकांनी घेतली. अखेर पोलिस आयुक्तांनी मध्यस्थी करून योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर, नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेत बार्शीकडे रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT