Rains hit 49 revenue circles in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यात शनिवारी सकाळपासून रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील तब्बल ४९ महसूल मंडळांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी म्हणजे ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात मागील चोवीस तासात सरासरी २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यात म्हणजे सरासरी ७४ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात ६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर २७ मिमी आणि जालना जिल्ह्यात २३ मिमी पाऊस बरसला आहे. असे असले तरी हा पाऊस काही महसूल मंडळांमध्ये अधिक बरसला आहे.
विभागातील तब्बल ४९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक २२ महसूल मंडळांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातही ९ मंडळांमध्ये आणि जालना जिल्ह्यातील दोन मंडळांमध्ये सरासरी ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथे मध्यरात्री वीज पडून शेतकरी सुधाकर साळवे यांचा एक बैल मरण पावला. तसेच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गेवराई कुबेर येथील शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या.
अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे (मिमी)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा अजिंठा (६६), आमठाणा (६७), बोरगाव (६७), अंभई (१०३), उंडणगाव (६६), सोयगाव (११४), सावळदबारा (१२६), बनोटी (८८), जरांडी (१०२).
जालना जिल्हा : भोकरदन (६८), पिंपळगाव (६५).
नांदेड जिल्हा : तळणी (११४), निवघा (१०४), पिंपरखेड (१०८),
आष्टी (१५८), किनी (९२), बोधाडी (११५), इस्लापूर (१२२), जलधारा (९३), शिवानी (१२२), मांडवा (८६), सिंदगी (२५५), हिमायतनगर (१५९), सरसम (१७३), अर्धापूर (८३), दाभाड (६६), मालेगाव (६८).
हिंगोली जिल्हा : हिंगोली (७७), नरसी (६८), सिरसम (६६), बसंबा (७२), दिग्रस (७६), मालहिवरा (६६), खांबाळा (६६), कळमनुरी (१२२), वाकोडी (१२२), नांदापूर (११३), आखाडा (९१), वारंगा (१०९), वसमत (७८), अंबा (७८), हयातनगर (७८), हट्टा (६९), टेंभुर्णी (७८), कुरुंदा (७८), औंढा (८५), येहळेगाव (६६), सालाना (८५), जवळा (८५).