Rains damage maize, cotton, vegetable crops - farmers seek help
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात उन्हाळ्याच्या मे महिन्यापासून सुरू असलेला पावसाचा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. सततच्या आणि अनियमित पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मका, कापूस यांसारखी खरीप पिके मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकावर पावसामुळे कुज येऊन पूर्ण नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके मोडून पडली असून, जमिनीची नासधूस झाल्याने रब्बी हंगाम पेरणीसुद्धा धोक्यात येऊन लांबण्याची शक्यता आहे. सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली असली तरी अजूनपर्यंत एकाही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर मदत जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने पंचनामे करून मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याने आम्ही दिवाळीतही चिंतेत होतो. आता पुन्हा पाऊस पडत असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे, फ्फ अशी खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही पावसाचा अंदाज वर्तविला असून, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल अक्षरशः सुरूच आहेत. पावसाचा जोर कमी न झाल्याने मका काढणीस अडथळा निर्माण झाला आहे. ओल्या जमिनीत मका काढणी करणे अशक्य झाले असून पिकावर कुज येण्यास सुरुवात झाली आहे.
कापसाचे पीक धोक्यात
कापसाचे पीक पूर्ण फुलोऱ्यात आला असला तरी सततच्या पावसामुळे कापूस ओला होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचता येत नाही. ओल्या कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने दर घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत, एकीकडे पिकाचे नुकसान आणि दुसरीकडे बाजारभाव घसरण्याचा धोका आहे.