गुंठेवारीचे चलन भरण्यासाठी बँकेबाहेर रांगा file photo
छत्रपती संभाजीनगर

Gunthewari : गुंठेवारीचे चलन भरण्यासाठी बँकेबाहेर रांगा

गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण : दंडमाफीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची लगबग

पुढारी वृत्तसेवा

Queues outside the bank to pay 'Gunthewari' (regularization) fees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुंठेवारी नियमितीकरणासाठी दिलेली ३१ ऑक्टोबरची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने महापालिकेत नागरिकांची धावपळ वाढली आहे. दंडमाफीमुळे नियमितीकरणाचा खर्च कमी झाल्याने अनधिकृत प्लॉट आणि घरे अधिकृत करून घेण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.

या प्रक्रियेसाठी गुरुवारी (दि.२९) निरालाबाजार येथील बँकेबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची वेळ आली. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. या गर्दीतून महापालिकेला एकाच दिवसात सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

गुंठेवारी नियमितीकरणासाठी दंडमाफी जाहीर झाल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम भरून मालमत्ता नियमित करता येत असल्याने अनेकांनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान गुरुवारी महापालिकेच्या गुंठेवारी कक्षात अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.

कर्मचाऱ्यांनी तातडीने चलन तयार करून देण्याचे काम केले. मात्र चलन भरण्यासाठी बँकेच्या निरालाबाजार येथील एकाच शाखेत सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांची तेथे मोठी गर्दी झाली. सकाळपासून लागलेल्या रांगा लांबत गेल्या. बँकेबाहेर गर्दी आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांची मदत घ्यावी लागली.

दरम्यान, गुंठेवारीचे चलन भरण्याची सुविधा एकाच ठिकाणी असल्याने राहावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आज शुक्रवार (दि.३०) पासून एचडीएफसी बँकेच्या अन्य शाखांमध्येही गुंठेवारीचे पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे चलन भरण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाण्याची शक्यता आहे.

महापौरांकडून कामकाजाचा आढावा

गुंठेवारीसाठी नागरिकांची होत असलेली धावपळ लक्षात घेऊन महापौर समीर राजूरकर यांनी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुंठेवारी कक्षाला भेट दिली. दिवसभरातील कामकाजाचा आढावा घेत त्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कामाचा ताण वाढल्यास कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली.

एकाच शाखेवरील ताण होणार कमी

निरालाबाजार येथील एकाच शाखेत चलन भरण्याची सुविधा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आजपासून एचडीएफसी बँकेच्या आकाशवाणी, पुंडलिकनगर, वाळूज, आयसीआयसी चौक-वाळूज, गुरुनाथ संकुल, बीड बायपास, सिडको, प्रोझोन मॉल, निरालाबाजार, टीव्ही सेंटर, स्टेशन रोड, मौलाना आझाद महाविद्यालय, विमानतळ, नक्षत्रवाडी आणि फुलंब्री अशा १५ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT