Chhatrapati Sambhajinagar News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : सीएसडीसीएचे मैदान असताना गरवारेवर 250 कोटींची उधळपट्टी

मनपा प्रशासनाचा अट्टहास, साऊथ पव्हेलियन नेमके कोणासाठी ?

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान करण्याचे गोंडस स्वप्न दाखवत तब्बल ५० कोटी रुपये खर्चुन साऊथ पव्हेलियन उभारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शहरात छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (सीएसडीसीए) स्वतःचे भव्य क्रिकेट मैदान उपलब्ध आहे. असे असतानाही महापालिका मुंबई, पुणे, नाशिकप्रमाणे स्वतःचे भव्य रुग्णालय उभारण्याऐवजी मैदानावर कोट्यवधींची उधळपट्टी कशासाठी करीत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील सिडको एन-२ परिसरात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे भव्य मैदान आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनची सलग्न असलेल्या जिल्हा असोसिएशनची १९९८ साली स्थापना झाली आहे. या संघटनेत शहरातील नावाजलेल्या क्रिकेट पटूंचा समावेश आहे. संघटनेचे मैदान असताना महापालिकेने आता गरवारे स्टेडियमला भव्य क्रिकेट मैदान करण्याची तयारी सुरू केली आहे.

या मैदानाला जिल्हा क्रिकेट असोसिएशनने विरोध दर्शविला होता. परंतु तत्कालीन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी अट्टाहास करीत मैदान उभारण्यावर जोर दिला. त्यांनी या मैदानासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांचीही भेट घेतल्याचे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून आयपीएल, एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात शहरात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे स्वतःचे मैदान असताना राज्य क्रिकेट असोसिएशन दुसऱ्या मैदानावर मॅचेस कसे खेळविणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, असे असतानाही महापालिकेने साऊथ पव्हेलियनच्या नावाखाली गरवारे मैदानावर ५० कोटींची उधळपट्टी करीत आहे. विशेष म्हणजे शहरात अद्याप मुंबई, पुणे नाशिकप्रमाणे महापालिकेचे स्वतःचे एकही मोठे रुग्णालय नाही. त्यावर खर्च करण्याऐवजी प्रशासनाने मैदानावर खर्चाचा घाट रचला आहे.

कलाग्राम पाडण्याचा घाट ?

पर्यटनाला चालना मिळावी यासाठी शासनाने चिकलठाणा एमआयडीसी परिसरात गरवारे स्टेडियमलगत कलाग्राम दालन उभारले आहे. यावर कोट्यवधींचा खर्च झाला असून, येथील गाळ्यांकडे एमआयडीसीसह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

करोडीच्या जागेचे काय ?

करोडी परिसरात राज्य शासनाने क्रिकेट मैदानासाठी जागा राखीव केली आहे, मात्र असे असतानाही महापालिकेकडून गरवारेवर उधळपट्टीचा घाट सुरू आहे.

पव्हेलियनसाठी वृक्षतोड

गरवारे स्टेडीयमवरील साऊथ पव्हेलियनचे काम केवळ महापालिकेच्या अट्टहासामुळेच सुरू असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. या पव्हेलियनसाठी लहान-मोठ्या ७५ झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यातील ३ झाडे कापण्यात आल्याचीही माहिती वृक्षप्रेमींनी दिली.

२५० कोटी येणार कोठून ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी तब्बल ३०० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. यातील साऊथ पव्हेलिनयसाठीच ५० कोटींची उधळपट्टी होत आहे. विशेष म्हणजे मॅचेस मिळणार की नाही, राज्य क्रिकेट असोसिएशनची सलग्नता असेल की नाही, हे नंतरची बाब आहे. पहिल्यांदा उर्वरित २५० कोटी येणार कोठून ?

गरवारे सीएसडीसीएला द्यावे लागेल

जिल्हा क्रिकेट असोसिएशन हे राज्य क्रिकेट असोसिएशनची सलग्न आहे. परंतु महापालिका तयार करीत असलेल्या गरवारे स्टेडियमवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम हे अद्याप राज्य क्रिकेट असोसिएशनच काय तर जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी देखील संलग्न नाही. त्यामुळे या मैदानावर एक दिवसीयच काय तर आयपीएलचे क्रिकेट सामने होणे अशक्य आहे. यासाठी हे स्टेडियम जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत द्यावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT