प्रकाश आंबेडकर File Photo
छत्रपती संभाजीनगर

OBC Reservation : भांडण मराठ्यांचे, बळीचा बकरा ओबीसी : प्रकाश आंबेडकर

आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपावेळा आंबेडकरांचे विधान

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आज हिंदू धर्म धोक्यात आलेला नाही तर तुमचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. हे आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसींनी पुढे आले पाहिजे. एकत्रित प्रयत्न करुन येत्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे शंभर आमदार निवडून आणले पाहिजेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (दि.7) आरक्षण बचाव यात्रेचा समारोपावेळी बोलताना केले.

मुंबई येथून निघालेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप बुधवारी (दि.7) छत्रपती संभाजीनगर येथे झाला. या सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर, अंजली आंबेडकर, नवनाथ वाघमारे, सुजात आंबेडकर, प्रभाकर बकले यांच्यासह ओबीसींच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

ओबीसींचे शंभर आमदार निवडून आणा

आंबेडकर यांनी यावेळी मनोज जरांगे, शरद पवार, भाजप आदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मनोज जरांगे यांनी दोन मागण्या केल्या. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे आणि सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावे या त्या मागण्या आहेत. या मागण्यांवर कोणत्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतली नाही. राजकीय पक्षांनी भूमिका घेतली नाही म्हणून सामाजिक परिस्थिती बिघडली. गावागावात मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. ही परिस्थिती शांत करण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि या यात्रेचा हेतू साध्य झाला आहे ओबीसी आरक्षणाला विधानसभा निवडणुकआधी धोका नाही, परंतु निवडणुकीनंतर धोका होऊ शकतो. त्यामुळे विधानसभेत ओबीसींचे शंभर आमदार निवडून गेले पाहिजे. तसे झाले तरच आरक्षण वाचेल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण बळीचा बकरा : प्रकाश आंबेडकर

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण तापले आहे. मराठा समाज इर्षेने पेटला आहे. खरं तर हे भांडण मराठा आणि प्रस्थापित निझामी मराठा यांचे आहे. मात्र, या भांडणात ओबीसी आरक्षण हे बळीचा बकरा ठरत आहे. तुमचे आरक्षण एकदा गेले तर ते तुम्हाला कधीही परत मिळणार नाही. ते देण्यासाठी पुन्हा व्ही. पी. सिंग येणार नाहीत. त्यामुळे शरीराने नाही तर मतदानाच्या अधिकाराने लढा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT