'पुढारी'च्या वृत्तमालिकेची दखल; महापौरांकडून तपासणीचे आदेश file photo
छत्रपती संभाजीनगर

'पुढारी'च्या वृत्तमालिकेची दखल; महापौरांकडून तपासणीचे आदेश

नाल्यालगत विहिरींचे पाणी टँकरमधून पुरवठा : दूषित पाण्यावर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

'Pudhari' News Series Taken Note Of; Mayor Orders Investigation

मुकेश चौधरी

छत्रपती संभाजीनगर : टँकरचा धंदा तेजीत, तहानलेल्या नागरिकांना नाल्याचे पाणी या वृत्तमालिकेतून उघड झालेल्या गंभीर प्रकाराची महापौर समीर राजुरकर यांनी दखल घेतली असून, शहरातील टैंकरमधून पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी करून दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वृत्तमालिकेतून शहरातील अनेक भागांत नाल्यांच्या काठावर असलेल्या विहिरींमधून पाणी उपसून ते खासगी टँकरद्वारे घराघरांत पोहोचवले जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले. प्रतापनगर, जवाहर कॉलनी, उस्मानपुरा, पन्नालालनगर, मोतीवालानगर, छावणी, रेल्वेस्टेशन परिसर, शहाशाक्ता कॉलनी आणि मुकुंदवाडी या भागांमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या विहिरींमध्ये सांडपाण्याचा थेट शिरकाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

महापालिकेकडून होणारा अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा हीच या परिस्थितीची मुख्य कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्यासाठी पर्याय नसल्याने नागरिक खासगी टँकरवर अवलंबून राहत आहेत. मात्र या टैंकर व्यवसायावर प्रभावी नियंत्रण नसल्याने गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वृत्तमालिकेनंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाल्यालगतच्या विहिरी तात्काळ बंद कराव्यात. टँकरच्या पाण्याची नियमित तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महापौर म्हणाले

शहरात खासगी टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असेल तर महापालिकेकडून संबंधित टँकरमधील पाण्याची नमुना तपासणी केली जाणार आहे. तपासणीत पाणी दूषित आढळले तर संबंधित टँकरचालक व पुरवठादारांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच नाल्यालगतच्या विहिरींची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी निर्बंध लावले जातील.

आता अंमलबजावणीची कसोटी

वृत्तमालिकेमुळे प्रशासनाला हालचाल करावी लागली असली तरी प्रत्यक्षात किती प्रभावी कारवाई होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. पाणीटंचाई आणि दूषित पाण्याचा धोका या दुहेरी संकटातून नागरिकांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT