Sambhajinagar News : परदेशी नागरिकांची माहिती २४ तासांत द्या, अन्यथा गुन्हे दाखल होणार file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : परदेशी नागरिकांची माहिती २४ तासांत द्या, अन्यथा गुन्हे दाखल होणार

ग्रामीण पोलिसांचा हॉटेल, लॉज चालकांना कडक इशारा; ई-एफआरआरओ पोर्टलवर नोंदणी बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

Provide information about foreign nationals within 24 hours, otherwise cases will be registered

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात वास्तव्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती आता हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस चालकांना त्यांच्या आगमनानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना देणे सक्तीचे करण्यात आले आहे. या माहितीत कसूर केल्यास किंवा माहिती लपवल्यास संबंधित निवासस्थान व्यवस्थापकांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने इमिग्रेशन अँड फॉरेन्स अॅक्ट २०२५ आणि रूल्स २०२५ मधील तरतुदींनुसार ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि. २६) हे आदेश जारी केले आहेत.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील सर्व हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, पेईंग गेस्ट आणि होम स्टे चालकांना त्यांच्याकडे राहण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती २४ तासांच्या आत ऑनलाईन पोर्टलवर भरणे बंधनकारक आहे.

परदेशी नागरिकाच्या आगमनाप्रमाणेच त्याच्या निर्गमनाची (चेक-आऊट) नोंदही २४ तासांच्या आत सबमिट करावी लागेल. निवासस्थानी आल्यावर परदेशी नागरिकाची स्वाक्षरी, वास्तव्याचा कालावधी, निर्गमनाची तारीख व वेळ आणि तो पुढे कोणत्या पत्त्यावर जाणार आहे, याची अचूक माहिती इ-एफआरआरओ या शासकीय पोर्टलवर वेळेत भरावी. या प्रक्रियेचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सुरक्षित जतन करून ठेवणे आणि पोलिसांकडून मागणी झाल्यास तपासणीसाठी उपलब्ध करून देणे हे चालकांचे कर्तव्य असेल.

माहिती लपवल्यास थेट कारवाई परदेशी नागरिकांची माहिती नोंदवण्यात दिरंगाई " करणे, चुकीची माहिती देणे किंवा ती लपवून ठेवल्यास इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. अशा प्रकरणात हॉटेल व निवासस्थान व्यवस्थापकांवर थेट गुन्हे दाखल करून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व संबंधितांनी या नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT