CM Devendra Fadnavis on Prithviraj Chavan
छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांना दिवसा स्वप्न पडतात, तशी त्यांना सवय आहे. मात्र असे काही होणार नाही, पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा उत्साह आणि ख्याती जगभर आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधानपदी मोदीच राहतील, असे सांगत, मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.५) पूर्णविराम दिला.
'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेचा विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
महावितरणच्या वतीने हा कार्यक्रम शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक सिटी येथील मैदानात आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला वर्षपूर्ती झाली. मग श्वेतपत्रिका काढा. अशा केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज आमच्या महायुती सरकारला वर्ष झाले, आजचा चांगला दिवस आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही. मात्र त्यांना टीका करण्याची सवय असून सर्व कामे त्यांना वाईट दिसतात. असे म्हणत त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर बोलणे टाळले.
आज महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. आणि आजच्या दिवशी महायुती सरकारच्या काळात प्रभावी ठरलेल्या सौर पंप कृषी योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला. या निमित्त आयोजित कार्यक्रमातच महायुती सरकारतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखासह आमदार खासदार आणि विशेषत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे महायुतीबाबत आता उलट सुलट चर्चांना उधाण आले.
मुंबई वरळी येथे भाजप आणि ठाकरे गट यांच्यात युनियनवरून राडा सुरू आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ताज लँड हॉटेलच्या बाहेर आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, युनियन लावण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मात्र युनियनच्या माध्यमातून तोडफोड आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जात असेल कायदा मोडणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल.