पोलिसाला मारहाण करुन गणवेश फाडला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पोलिसाला मारहाण करुन गणवेश फाडला

खाकीवर पुन्हा हात : हडको भागातील घटना, रिक्षाचालकासह पालकांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Policeman beaten up and his uniform torn

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील हायकोर्ट सिग्नलवर वाहतूक पोलिसाला झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच, सिडको भागात एका पोलिस अंमलदारावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना एका मद्यधुंद रिक्षा चालकाने आणि त्याच्या पालकांनी मिळून अंमलदाराला मारहाण करत त्यांचा गळा दाबला आणि गणवेशाची नेमप्लेट व बटणे तोडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (दि.२२) सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान सुदर्शन नगर, एन ११, हडको भागात घडली.

शुभम राजेंद्र रणयेवले, राजेंद्र रणयेवले आणि माया राजेंद्र रणयेवले (सर्व रा. नवजीवन कॉलनी, एन-११, हडको) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. फिर्यादी पोलिस अंमलदार विनोद खरात हे सिडको ठाण्यात नेमणुकीस आहेत. रविवारी (दि. २२) सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास डायल ११२ वर एका तक्रारदाराचा कॉल आला.

एन-११ सुदर्शननगर येथील साई मैदानाजवळील नम्रता किराणा दुकानासमोर एका मद्यधुंद रिक्षाचालकाने कारला धडक दिली असून, तो वाद घालत असल्याची माहिती मिळाली होती. अंमलदार खरात आणि त्यांचे सहकारी कवाळे तातडीने घटनास्थळी पोहोचले.

तेथे आरोपी शुभम रणयेवले हा नशेत असल्याचे दिसून आले. तो तक्रारदार आणि त्यांच्या महिला नातेवाइकांना शिवीगाळ करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केला असता शुभमच्या आईने खरात यांचा हात ओढून धरला आणि मुलाला नेण्यास विरोध केला.

पोलिसाचा गळा दाबला

आरोपी शुभमने पोलिस अंमलदार खरात यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. झटापटीत त्याने खरात यांच्या वर्दीची नेमप्लेट, लाईनयार्ड आणि शर्टाचे बटण तोडून टाकले. इतक्यावरच न थांबता, शुभमचे वडील राजेंद्र रणयेवले यांनी पोलिस अंमलदाराचा गळा दाबला.

अखेर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभमला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक निवृत्ती गायके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT