कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी घेतली १४ लाखांची लाच File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Bribery case : कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी घेतली १४ लाखांची लाच

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि त्यांच्या रायटरने एका मोठ्या प्रमाणात कारवाई टाळण्यासाठी १४ लाखांची लाच स्वीकारल्याचा दावा करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी तडकाफडकी कारवाई केली आहे.

पैसे मोजतानाचा व्हिडिओ

समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडिओत एका कारमध्ये बसून रोख रक्कम मोजली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन, तीन, पाच आणि सात लाख अशा टप्प्यांत पैसे मोजण्यात येत आहेत. १३ लाख रुपये मोजून झाल्यानंतर गणेश गायकवाड नावाचा व्यक्ती आम्हाला १५-१५ लाख द्यावे लागतात, हे पैसे पुढे वाटावे लागणार आहेत, असे म्हणत आणखी एक लाखाची मागणी करताना स्पष्ट आवाज ऐकू येत आहे. हा संपूर्ण व्यवहार लेणी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा उत्खननावर कारवाई न करण्यासाठी झाल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या नावाने १२ लाख रुपये आणि पैसे स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी २ लाख रुपये, असा १४ लाखांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे.

निलंबन आणि बदली

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. खात्याची प्रतिमा मलीन झाल्याने वरिष्ठ अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासाअंती व्हिडिओमध्ये दिसणारा कर्मचारी गणेश गायकवाड याला निलंबित करण्यात आले आहे, तर पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT