गंगापूर : गंगापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींमुळे नागरिक हैराण झाले होते. सुसाट वेगात धावणाऱ्या व मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या बुलेटमुळे महिला, मुली, लहान बालके तसेच वृध्द नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर या गंभीर समस्येची दखल घेत पोलिसांनी शनिवारी (दि.17) शहरात विशेष मोहीम राबवत कडक कारवाई केली.
शहरात कर्कश हॉर्न व अनधिकृत सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली होती. रस्त्यावरून बुलेट जाताच कानठळ्या बसाव्यात असा आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये तीव नाराजी होती. याबाबत शहरातील अभिषेक जयवंत चव्हाण व रोहित सुनीलकुमार बर्वे यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती.त्यानुसार वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर व अनधिकृत हॉर्न लावलेल्या वाहनांविरोधात मोहीम हाती घेतली.
या कारवाईत आठ बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या बुलेटवरील कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करून चालकांकडून एकूण आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कारवाई पोलिस निरीक्षक झोटे, उपनिरीक्षक रौफ शहा, पोलिस अंमलदार संतोष गिरी, पोलिस हवालदार गायकवाड आदींनी केली.
..तर कडक कारवाई करणार
भविष्यात कोणीही अनधिकृत व कर्णकर्कश सायलेन्सर लावू नये, अन्यथा यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील बुलेट चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मात्र पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.