छत्रपती संभाजीनगर: मित्रांसोबत खेळण्याचा निरागस आनंद, क्रिकेटच्या चेंडूमागे धावण्याची स्पर्धा आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं... शनिवारी (दि.२) सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोरील भोईवाडा परिसरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. अवघा सात वर्षांचा अहाद आणि पाच वर्षांचा सिफान यांचा खेळ नियतीला मान्य नव्हता. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सादात मशिदीच्या मागे महापालिकेचे एक बंद सभागृह आहे. त्याच्यासमोरील मोकळ्या मैदानात शनिवारी सायंकाळी काही मुले क्रिकेट खेळत होती. यातच अहाद शरीफ शहा (वय ७) आणि सिफान शाकेर खान (वय ५) हे दोघेही आपल्या उमर नावाच्या मित्रासोबत खेळात दंग होते. खेळता-खेळता त्यांचा क्रिकेटचा चेंडू जवळच असलेल्या एका बांधकाम साईटवरील पाण्याच्या खड्ड्यात पडला. हा खड्डा गेल्या दोन वर्षांपासून खोदलेला असून, पावसामुळे त्यात सात फुटांपेक्षा जास्त पाणी साचले होते.
चेंडू काढण्यासाठी सिफान आणि अहाद पाण्यात उतरले, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा थरारक प्रकार त्यांच्यासोबत असलेल्या मित्र उमरने पाहिला आणि मदतीसाठी तो धावतच वस्तीकडे गेला. उमरने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. काहींनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी आणि नागरिकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. काही वेळातच दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. आपल्या पोटच्या गोळ्यांना निष्प्राण अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
मयत सिफानचे वडील एका खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये एजंट म्हणून काम करतात, तर अहादचे वडील फळांचा गाडा लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अहाद हा त्यांच्या दोन मुलांमधील एकुलता एक मुलगा होता. या दोन्ही गरीब कुटुंबांवर आभाळच कोसळले असून, त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जागा मालकावर गंभीर आरोप केले आहेत. "दोन वर्षांपासून हा खड्डा धोकादायक स्थितीत उघडा पडला होता. त्याला कोणतेही कुंपण नव्हते किंवा सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केली नव्हती. जागा मालकाच्या हलगर्जीपणामुळेच आमची मुले गेली," असा आरोप करत कुटुंबीयांनी जागा मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीसाठी नातेवाईकांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने केवळ दोन कुटुंबेच उद्ध्वस्त झाली नाहीत, तर शहरांमधील उघड्या आणि असुरक्षित बांधकामांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या आणि जागा मालकांच्या एका छोट्याशा चुकीची किती मोठी किंमत मोजावी लागते, हेच या घटनेतून अधोरेखित झाले आहे.