Crime News : पिझ्झाच्या स्टोअर मॅनेजरकडून सव्वातीन लाखांचा अपहार file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पिझ्झाच्या स्टोअर मॅनेजरकडून सव्वातीन लाखांचा अपहार

तापडिया प्लाझामधील प्रकार; क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Pizza store manager misappropriates ₹3.25 lakh

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निराला बाजार परिसरातील तापडिया प्लाझा येथे असलेल्या डोमिनोज पिझ्झा स्टोअरच्या मॅनेजरने ग्राहकांकडून आलेली तब्बल ३ लाख २१ हजार १४७ रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अंतर्गत ऑडिटमध्ये हा घोटाळा समोर आल्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात स्टोअर मॅनेजरवर सोमवारी (दि.५) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान अनिस शेख (रा. अकबर नगर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी जुबिलंट फूडवर्क प्रा. लि. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर अभिषेककुमार चौहान (३०, रा. ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीतर्फे भारतात डोमिनोज पिझ्झा चालवले जाते आणि शहरातील निराला बाजार भागातील तापडिया प्लाझा येथे त्यांची एक शाखा आहे.

आरोपी इम्रान शेख हा सन २०२५ पासून या स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होता. स्टोअरमध्ये होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीतून येणारी रोख आणि ऑनलाईन रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. सन २०२५ मध्ये खाद्यपदार्थांची विक्री आणि त्यामाध्यमातून जमा होणारी रक्कम याच्यामध्ये मोठी तफावत दिसून येत होती.

यामुळे कंपनीने जानेवारी २०२६ मध्ये स्टोअरचे अंतर्गत ऑडिट केले. या तपासणीदरम्यान, ११ सप्टेंबर २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत स्टोअर मॅनेजर इम्रान शेख याने तब्बल ३ लाख २१ हजार १४७ रुपये कंपनीकडे जमा केलेच नसल्याचे आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुकीबाबत परिमंडळ-१ च्या पोलिस उपायुक्तांकडून रीतसर परवानगी मिळाल्यानंतर, अभिषेककुमार चौहान यांनी सोमवारी (दि. ५) क्रांती चौक ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT