Couple robbed at a farm settlement in Shankarpur after being threatened with weapons
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर तालुक्यातील शंकरपूर शिवारात शेतवस्तीवर झोपलेल्या दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी कैलास गायकवाड व त्यांच्या पत्नी रंजना यांच्या गळ्याला चाकू आणि कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रंजना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि गोठ्यातील दहा लहान-मोठ्या बकऱ्या वाहनात भरून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी (दि. २१) रात्री कैलास व रंजना गायकवाड शेतवस्तीवरील घरात झोपले होते. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दाम्पत्याला शस्त्रांचा धाक दाखवत आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या दाम्पत्याला प्रतिकार करता आला नाही. चोरट्यांनी रंजना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून घेतले.
त्यानंतर गोठ्यातील दहा बकऱ्या वाहनात कोंबून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. दरम्यान अनेक शेतकरी शेती करण्यासाठी शेतवस्तीवर राहतात. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
शेतवस्तीवरील कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी चोरीचा तपास करून आरोपींना अटक करावी, चोरीला गेलेले मंगळसूत्र व बकऱ्या हस्तगत कराव्यात आणि ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.