छत्रपती संभाजीनगर

पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान कोमात

Chhatrapati Sambhajinagar | निधीअभावी वैभव हरवण्याची भीती, अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यान हे मैसूरच्या वृंदावन गार्डन्सच्या धर्तीवर उभारलेले मराठवाड्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असले तरी दुर्लक्षामुळे अस्तित्वाच्या संकटात सापडले आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची इच्छाशक्ती आणि शासनाकडून निधीचा अभाव यामुळे उद्यानाचे वैभव हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असून, पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्याचे वैभव मानले जाणारे हे उद्यान सध्या कोमात गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून, तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.

काही वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या शासकीय उद्यानाला तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाकडून विशेष निधी मिळवून १ जानेवारी रोजी पुन्हा पर्यटकांसाठी खुले केले होते. मात्र, त्यानंतर आवश्यक मनुष्यबळाची कमतरता आणि देखभाल खर्चासाठी निधी उपलब्ध न झाल्याने परिस्थिती पुन्हा बिघडू लागली आहे.

उद्यानातील संगीत कारंजे, फुलझाडे व हिरवळ यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याचे सांगितले जात असून कामे ठप्प झाली आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने पाणी साचत असून परिसराची स्वच्छता देखील रखडली आहे. याबाबतचा अहवाल संबंधित अभियंत्यांनी वरिष्ठांकडे सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आमदार विलास भुमरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना नवीन टेंडर प्रक्रिया वेगाने राबविण्याचे निर्देश दिले असले तरी निधीअभावी कामांना गती मिळालेली नाही.

निधी उपलब्ध करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाचे पवन लोहिया आणि उद्यान विकास समितीचे रमेश शेळके यांनी शासनाने तातडीने विशेष निधी उपलब्ध करून उद्यानाचे जतन करावे, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT