पैठण : पैठण तालुक्यातील घारेगाव येथील सुखना नदीपात्रातून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्यांवर पाचोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवारी (दि. २३) केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ३० लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घारेगाव परिसरातील सुखना नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सपोनि पंडित यांनी आपल्या पथकासह शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात छापा टाकला.
यावेळी पाच ट्रॅक्टरद्वारे वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पाचही ट्रॅक्टर चालकांना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे, लक्ष्मण विष्णू वीर (वय २५), विष्णू भीमराव लहाने (वय ५८), भरत काकासाहेब लहाने (वय ३५),सतीश गणेश लहाने (वय ३४, सर्व रा. घारेगाव), प्रल्हाद तेजराव वाघ (वय २५, रा. दरकवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
या कारवाईत पोलिसांनी पाच विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, वाळूने भरलेल्या ट्रॉल्या असा एकूण ३० लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या पाचही आरोपींविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे आणि बीट जमादार रणजितसिंग दुल्हत यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे करीत आहेत.