पैठण: आपल्या हक्काच्या शेतजमिनीवर गुंडांनी केलेल्या कब्ज्याविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी एका कुटुंबाने पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे या कुटुंबाला रात्रीच्या वेळी अंधारात बसून उपोषण करण्याची वेळ आली आहे.
रहाटगाव येथील रावसाहेब लिंबाजी माटे यांचे कुटुंब गट क्रमांक ४० मधील जमिनीवर उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आरोपानुसार, ३ जून रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांना मारहाण करून आणि शस्त्राचा धाक दाखवून जमिनीवर ताबा मिळवला. याप्रकरणी पोलिसांनी केवळ किरकोळ कारवाई केल्याने, माटे कुटुंबाने महसूल प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
बुधवार, १४ ऑगस्टपासून माटे यांनी आपल्या लहान मुलांसह आणि वृद्ध सदस्यांसह उपोषण सुरू केले आहे. उपोषणाची पूर्वसूचना १५ दिवसांपूर्वी देऊनही तहसील प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. उपोषणस्थळी विजेसारखी मूलभूत सोयही उपलब्ध करून दिलेली नाही. राजकीय दबावामुळे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माटे कुटुंबाने केला आहे.
दरम्यान, पैठण तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांना सुविधा नाकारण्याचा हा प्रकार नवीन नाही. आंदोलकांना त्रस्त करून त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी वीज आणि पाण्याची सोय जाणीवपूर्वक टाळली जाते, ज्यामुळे त्यांना आपला जीव मुठीत धरून आंदोलन करावे लागते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.