पैठण (छत्रपती संभाजीनगर ) : पैठण येथील नगरपरिषद विविध प्रभागांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोग निर्देशानुसार जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महिला अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, पैठण शहरातील नगराध्यक्ष व विविध प्रभागांच्या नगरसेवक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत आदर्श आचारसंहिता व निवडणूक कामकाज हाताळण्यासाठी जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी पैठण न.प निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांची, तर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार ज्योती पवार यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पैठण नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झालेल्या महिला अधिकाऱ्यांनी निवडणूक कामकाज पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वेगवेगळे पथक तयार करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.