नाथ वाडा येथे फुलांच्या उधळणीत रंगपंचमी साजरी करण्यात आली  
छत्रपती संभाजीनगर

Paithan News | ‘अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ : नाथवाड्यात फुलांच्या उधळणीत रंगपंचमी

मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात फाग उत्सव साजरा

पुढारी वृत्तसेवा

पैठण :- पैठण येथील श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पावन भूमीत त्यांच्या राहत्याघरातील वाडा मंदिरात धुलीवंदनाचे औचित्य साधून मंगळवार दि.३ रोजी फाग उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा रंगाऐवजी सुगंधित फुलांची उधळण करून एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक धुलीवंदन सोहळा पार पडला असून. उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक महिला लहान बालकांनी सहभाग घेतल्यामुळे नाथमंदिर परिसर फुलून गेले होते.

या फाग उत्सवासाठी सुगंधित चैत्री गुलाब इंदूर, जालना आदी विविध भागांतून खास मागविण्यात आले होते. गुलालाची उधळण करण्यासाठी विशेष गुलाल देशातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांतून आणण्यात आला होता. द्वारका, नाथद्वारा, जगन्नाथ पुरी, वृंदावन, तिरुपती बालाजी मंदिर, कोल्हापूर तसेच कांची कामकोटी पीठ येथून आणलेला हा विशेष गुलाल प्रसादरूपाने भाविकांच्या अंगावर उधळण्यात आला.

यंदाच्या फाग उत्सवासाठी तब्बल १० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती गोवत्स परिवाराच्या वतीने देण्यात आली. मागील आठ वर्षांपासून हा फाग उत्सव गोवत्स परिवारतर्फे सातत्याने साजरा केला जात असून. शालिवाहन परिवाराची दरवर्षी या कार्यक्रमासाठी भक्तीसेवा लाभते.

“अबीर गुलाल उधळीत रंग… नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…”

या सुरेल अभंगाच्या तालावर नाथ महाराज मंदिरात भक्तिरसाने न्हालेला कार्यक्रम पार पडला. शहरातील महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदविला. यंदा बाहेरील जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहिल्याचे संयोजकांनी सांगितले. फुलांच्या सुगंधाने दरवळलेला आणि भक्तिरसाने रंगलेला हा फाग उत्सव पैठणकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT