पैठण : "जर संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आपेगाव (ता. पैठण) येथे झाला नसता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीला गेले असते का?" असा सवाल आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी शनिवारी (दि. १६) आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित केला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मस्थळी, आपेगाव येथे, सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अष्टमीच्या रात्री माऊली मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. बाल वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर जन्मोत्सवाचा आनंद घेतला.
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासकीय महापूजेसाठी आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी स्वतः निमंत्रण दिले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आळंदी येथे सुवर्ण कळस बसवण्यासाठी गेले आणि माऊलीच्या जन्मभूमीत येऊ शकले नाहीत. याबद्दल खंत व्यक्त करताना कोल्हापूरकर म्हणाले, "जर माऊलींचा जन्म आपेगाव येथे झाला नसता, तर मुख्यमंत्री आळंदीला गेले असते का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या सोहळ्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माऊली मंदिरात दर्शन घेतले. आयोजक आमदार विलास बापू भुमरे यांनी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. ह.भ.प. अवचित महाराज दस्तापुरकर यांच्या मानाच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.
राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, बळीराम औटे, किशोर चौधरी, तुषार पाटील, भूषण कावसानकर, सरपंच पोपट औटे, राजेंद्र औटे, दत्ता गोर्ड, मनोज पेरे, अजय परळकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.