Nathsagar Dam power cut Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi Dam | नाथसागर धरणाचा वीजपुरवठा खंडित; थकीत बिलामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण

थकीत वीज बिलामुळे महावितरण विभागाने धरणाचा वीजपुरवठा खंडित केला

पुढारी वृत्तसेवा

Nathsagar Dam power cut

पैठण : मराठवाड्यातील औद्योगिक तसेच शेती सिंचनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे पैठण येथील नाथसागर धरण सध्या अडचणीत सापडले आहे. थकीत वीज बिलामुळे महावितरण विभागाने बुधवारी (दि. २५) धरणाचा वीजपुरवठा खंडित केला असून यामुळे धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महावितरणकडील सुमारे ६ लाख रुपयांच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली. दुपारच्या सुमारास वीजपुरवठा बंद करण्यात आल्यानंतर नाथसागर धरण परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे धरणाची तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा कशी करावी, असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, मार्चअखेरच्या कामकाजामुळे सर्व शासकीय विभाग व्यस्त असताना महावितरणने वसुलीसाठी घाईत ही कारवाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. थकीत रक्कम भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असतानाही वीजपुरवठा खंडित केल्याने पर्यटकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नाथसागर धरण परिसरातील थकबाकी सुमारे ६ लाख रुपये असून ती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. धरणासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा विचार करून महावितरण विभागाने सहकार्य करणे अपेक्षित होते.
मंगेश शेलार, धरण उपअभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT