Jayakwadi Dam Independence Day Lighting
पैठण: मराठवाड्याचे वरदान ठरलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणाच्या २७ दरवाजांवर तिरंग्याच्या रंगांची प्रकाशयोजना करण्यात आली असून, रात्रीच्या अंधारात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांनी उजळून निघणारे धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
धरणावर पडणारे प्रकाशकिरण आणि त्यांचे नाथसागराच्या पाण्यात उमटणारे प्रतिबिंब यामुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार आहे. धरण सध्या ९३ टक्क्यांहून अधिक भरले असून, सुमारे सहा हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या मुख्य २७ दरवाजांतून होणारा विसर्ग बंद आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने धरणाच्या १० ते २७ क्रमांकाच्या दरवाजांवर तिरंगा रंगांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. यासाठी १८ लेझर लाईट्सचा वापर करण्यात आला असून, नऊ दरवाजांवर विशेष तिरंगा लाईटिंग करण्यात आले आहे.
१४ ऑगस्टच्या रात्रीपासून ही रोषणाई सुरू करण्यात येणार असून, १५ ऑगस्टच्या रात्री हिंदी देशभक्तीपर गीतांच्या तालावर नाथसागरावर लेझर लाईट शो साकारण्यात येणार आहे. देशभक्तीपर गीतांचा निनाद, तिरंग्याची रोषणाई आणि पाण्यावर उमटणारे रंगीबेरंगी प्रकाशकिरण यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या रात्री जायकवाडी धरणाचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
राष्ट्रीय सण आणि महत्त्वपूर्ण उत्सवांच्या निमित्ताने जायकवाडी धरणावर अशा प्रकारची आकर्षक विद्युत प्रकाशयोजना यापूर्वीही करण्यात आली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याच्या रंगांनी सजलेला नाथसागर नागरिक आणि पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे.