मागील आठवड्यातील अतिवृष्टी आणि चुकीच्या पाणी विसर्गामुळे झालेल्या नुकसानीतून पैठण तालुका सावरत असतानाच, ऐन दिवाळीच्या दिवशी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
या नवीन पावसामुळे पूर आणि नुकसानीने त्रस्त झालेल्या अनेक गावांमध्ये नागरिकांवर अंधारातच दिवाळीची पूजा करण्याची वेळ आली आहे.
नैसर्गिक संकटांच्या या मालिकेमुळे अनुदान मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्तांचे दुःख वाढले आहे, ज्यामुळे पैठणकरांची दिवाळी कठीण झाली.
पैठण : मागील आठवड्यात अतिवृष्टी आणि नाथसागर धरणातून पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या विसर्ग नियोजनामुळे आलेल्या महापुराने पैठण तालुक्याला मोठा फटका बसला. हजारो शेतकऱ्यांचे शेतीतील उभे पीक व फळबागा खरडून गेल्या, तर गोदावरी नदीला सोडलेल्या चार लाखांहून अधिक पाण्याच्या विसर्गामुळे पैठण शहरातील सखल भागातील गरीब नागरिक व मजुरांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.
या नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या पैठणकरांना राज्य शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, हे नुकसानभरपाईचे अनुदान मिळण्याआधीच मंगळवारी (दि. २१) दिवाळी सणाच्या दिवशी रात्री पुन्हा एकदा निसर्गाने संकट उभे केले. तालुक्यात वादळी वाऱ्यासह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.
या अचानक आलेल्या पावसामुळे पैठण, पिंपळवाडी, बालानगर, रहाटगाव, ढाकेफळ, कातपूर, राहुलनगर, आपेगाव, वडवाळी, पाटेगाव, ७४ जळगाव, दक्षिण जायकवाडी यासह अनेक गावांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन दिवाळीच्या सणाच्या दिवशी पाऊस आणि वादळामुळे अनेक गावांमध्ये अंधारातच दीपावलीचे पूजन करण्याची दुर्दैवी वेळ नुकसानग्रस्त नागरिकांवर आली आहे. नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे पैठण तालुका पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे.