पैठण : पैठण शहरातील गोदावरी नदीत गुरुवारी दुपारी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन बाल वारकऱ्यांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यामधील चैतन्य अंकुश बदर याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळीच शोध कार्यात सापडला. परंतु भोलेनाथ कैलास पवळे (वय १३) रा. औराळा, ता. कंधार, जि. नांदेड याचा शोध लागला नव्हता. शुक्रवारी (दि.२१) सकाळी साडेआठ वाजता स्थानिक मच्छीमार युवक व पोलीस, अग्निशमन दलाच्या पथकाने पुन्हा शोध मोहीम राबवल्यानंतर मृतदेह सापडला आहे.
पैठण येथील रंगारहाटी परिसरातील विष्णू महाराज गायकवाड यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक शिक्षण घेणारे चार बाल वारकरी गोदावरी नदीच्या पाण्यात गुरुवारी आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच पाण्यात बुडत असणाऱ्या चार पैकी अर्जुन राजूरकर (वय १४) व किरण तुपे (वय १२) या दोघांना वाचविण्यात यश आले होते. यातील चैतन्य अंकुश बदर व भोलेनाथ कैलास पवळे हे दोघे पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल यांच्या पोलीस पथकाने स्थानिक मच्छीमार युवक व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. सायंकाळी चैतन्यचा मृतदेह सापडला. त्यानंतर शोधकार्य थांबवले होते. आज सकाळी भोलेनाथ याचा मृतदेह सापडला.