पैठण : पैठण विभागाचे डीवायएसपी सुनील पाटील यांच्या पथकाने पाटेगाव येथील गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्याविरुद्ध सोमवारी (दि.19) कारवाई केली, मात्र जिल्हा गौण खनिज विभागाच्या पथकाने वाळू उत्खनन करणाऱ्या यारी मशीनच्या दोऱ्या जाळून कारवाईचा देखावा केल्याचा प्रकार घडला आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव, नायगाव, वडवळी गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची तस्करी करणारी टोळी खुलेआम नदीतील लाखो रुपयाच्या वाळूवर दरोडा टाकीत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने सोमवारी पैठण विभागाचे डीवायएसपी सुनील पाटील यांच्या पथकातील पोकॉ गणपत भवर, अरुण जाधव, भगवान धांडे, ओम डहाळे यांनी पाटेगाव येथील गोदावरी नदीत छापा मारून अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत असताना उत्खनन करणारी यारी मशीन ट्रॅक्टर जप्त करून पोह राजेश आटोळे यांच्या तक्रारीवरून सोमनाथ अर्जुन घेवारे (रा.पाटेगाव) विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रावसाहेब आव्हाड करीत आहेत.
कारवाईच दिखावा
दरम्यान, रविवारी रात्री जिल्हा अधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचे प्रमुख दिनेश झापले यांच्यासह पथक पैठण येथे कारवाईसाठी आले होते. परंतु सदरील पथकाने वाळू उत्खनन करणाऱ्या यारी मशीनच्या दोऱ्या जाळून कारवाईचा दिखावा तयार केल्याचा प्रकार घडला आहे.