पैठण : शहरामध्ये काल रात्री अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.३) सकाळी आठ वाजता संत ज्ञानेश्वर उद्यानमधील झाड झुडपे असलेल्या पाण्याच्या वड्याच्या परिसरात पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची गंभीर घटना समोर आली. पत्नीला कायमचं संपवून आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. खून झालेल्या महिलेचे नाव मंदाबाई सुरेश अंगारखे (वय ४५ रा. गांगलवाडी ,नारळा पैठण) असे आहे.
अधिक माहिती अशी की, आरोपी पती आणि पत्नी नेहमीप्रमाणे आज (दि.3) सकाळी संत ज्ञानेश्वर उद्यानातील झाड झुडपे असलेल्या पाण्याच्या वड्याजवळ लाकडाचे सरपण तोडण्यासाठी गेले होते. यावेळी पती सुरेश अंगारखे याने मंदाबाईवर सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने जोरदार तीन वार करून कायमचं संपविले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचं लक्षात येताच आरोपी सुरेश अंगारखे स्वत पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना "मी बायकोला कायमचं संपविले" असे सांगितले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग,ऋषिकेश तळेकर, पो.कॉ शुभम पाटील, कल्याण ढाकणे सह पोलीस पथकाने घटनास्थळ पडताळणी करुन पाहणी पंचनामा केला. महिलेचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलीस पथकाने ज्या कुऱ्हाडीने पत्नीचा खून केला सदरील कुऱ्हाड जप्त केली. पतीने पत्नीचा खून कोणत्या कारणाने केला या संदर्भात पैठण पोलीस पुढील तपास करीत आहे.