पैठण :- अनेक जिल्ह्यांमध्ये सोलर वायर सह लुटमार करून धुमाकूळ घालून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका खतरनाक टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामकरवाडी येथे फिल्मी स्टाईल थरारक पद्धतीने कारवाई करून सराईत गुन्हेगार पवन काळे सह १७ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील पाचोड येथे दि.१ मार्च रोजी रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान येथील सब स्टेशनवर काही अज्ञात व्यक्तीने साहित्याची मोठी तोडफोड करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते यावेळी १ लाख १० हजारांची वायर लंपास करून हे चोरटे अंधाराचा फायदा फरार झाले होते. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात सोलर टेक्निशियन भाऊसाहेब लहू पवार यांनी सपोनि सचिन पंडित यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पाचोड पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केले असता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली की, यामागे पवन उर्फ छन्नू महादेव काळे रा. खामकरवाडी या टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपी ज्या गावात राहतात ते गाव खामकरवाडी हे गाव पोलिसांवर हल्ले करण्यासाठी कुप्रसिद्ध असल्याने तिथे जाऊन आरोपीला पकडणे मोठे आव्हानात्मक होते. गुन्हे शाखेच्या पथकाने गनिमी कावा वापरून शुक्रवार दि.१३ रोजी सापळा रचला लावून फरार टोळी चालवणारा आरोपी पवन काळेला फिल्मी स्टाईल पद्धतीने अटक केली.
दरम्यान या टोळीचा आंतरजिल्हा गुन्हेगाराशी कनेक्शन असल्यामुळे या टोळीने अनेक जिल्ह्यात लुटमार चोरी गुन्हे करून नेहमी पोलिसांना गुंगारा देत असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत आरोपी पवन काळेची चौकशी केली असता त्याने वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या गुन्ह्या संदर्भात कबुली दिले. या आरोपीचे जाळे किती विस्तारलेले असल्याचा खुलासा झाला झाल्यामुळे पोलीस पथक देखील चक्रावून गेले. या कारवाईच्या मोहीम मध्ये अटक करण्यात आलेले आरोपी पवन उर्फ छन्नू महादेव काळे (मुख्य सूत्रधार), सुनिल बापू तपकिरे (रा. भोसा - साथीदार), तवाब नवाब खान (माल विकत घेणारा दुकानदार), ईश्वर पांडुरंग गवळी (गाडीचा मालक).
तपासात समोर आले की, ही टोळी केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर जालना, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर सह अनेक ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये सक्रिय राहून धुमाकूळ घालीत होती. मुख्य आरोपी पवन हा धाराशिवच्या वाशी आणि मुरुम पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार होता. इतकेच नाही तर धुळे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्यावर टायर फेकून वाहने लुटण्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, मोबाईल फोन, चोरीची तांब्याची वायर आणि रोख रक्कम असा एकूण १७ लाख ८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदरील कारवाईची मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, स.पो.नि. पवन इंगळे, स.पो.नि. सुधीर मोटे, पोलीस अंमलदार सचिन राठोड, सुनील गोरे, विष्णू गायकवाड, अशोक वाघ, महेश बिरुटे, अनिल काळे, बलवीरसिंग बहुरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप आणि संजय तांदळे यांनी केली आहे. पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित करत आहे.