पैठण : पुढारी वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपी व हत्याऱ्यांना सहकार्य करणाऱ्या राजकीय पक्षाच्या मंडळीं विरुद्ध निषेध करण्यासाठी पैठण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बंदला आज (रविवार) दि.९ रोजी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला आहे. या बंदमध्ये जीवनावश्यक वस्तू दुकाने व परिवहन महामंडळाच्या बस सेवा सुरळीत सुरू आहेत.
दरम्यान बंद काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. नेहमीप्रमाणे भाजी मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील भाजीपाला विक्रीसाठी आणलेला आहे. दशक्रिया विधी घाटावर दररोज पूजा विधी संपन्न होत आहेत.
दुपारी मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर कै. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून आरोपींना सहकार्य करणाऱ्यां विरुद्ध तात्काळ कारवाईच्या मागणीसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा द्यावा. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी शासन दरबारी निवेदन देण्यात येणार आहे.