पैठण : पैठण तालुक्यातील थेरगाव येथे पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. गावातील पाणीटंचाईमुळे गळक्या जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ३) सकाळी घडली. या घटनेमुळे थेरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
थेरगावची लोकसंख्या सुमारे पाच हजार असून, गावातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. पैठण धरणातून जालन्याकडे जाणारी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी थेरगाव परिसरातून गेली आहे. या जलवाहिनीवरील गळक्या एअर व्हॉल्व्हमधून पाणी येत असल्याने गावातील महिला व नागरिक दररोज तेथे पाणी भरण्यासाठी गर्दी करतात.
गुरुवारी सकाळी दयानंद दानियल आहेर (वय ३५, रा. थेरगाव, ता. पैठण) हे पाणी भरण्यासाठी जलवाहिनीवरील गळक्या एअर व्हॉल्व्हजवळ गेले होते. त्याचवेळी पैठणकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आहेर गंभीर जखमी झाले.
ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे आणि डॉ. प्रकाश साबळे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे उपचार सुरू असताना दयानंद आहेर यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.
थेरगावमध्ये पाणीटंचाई असल्याने गेल्या काही दिवसांपासून पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र, ३१ ऑगस्टपासून हे टँकर बंद करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांसमोरील पाण्याचे संकट अधिक तीव्र झाले असून, प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.