Our own mayor in the Municipal Corporation, BJP, both Shiv Senas and MIM claim
अमित मोरे / मुकेश चौधरी छत्रपती संभाजीनगर, : महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेणार आहेत.
त्यामुळे भाजप, दोन्ही शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व २९ प्रभागांमध्ये स्वबळाच्या चाचपणीवर भर दिला असून, आरक्षण काहीही पडो, महापौर तर आमच्याच पक्षाचा होणार, असा दावा या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल ५ वर्षे पुढे ढकलल्या गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यंदा संपूर्ण राज्यात प्रभागनिहाय निवडणुका होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच या पद्धतीचा अवलंब होत आहे. चार वॉर्डाचा एक प्रभागानुसार महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्यावर आक्षेप नोंदविण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता त्यांची सुनावणी होणार असून, त्यानंतर आरक्षणाची सोडत होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही प्रभाग रचना अंतिम होणार आहे. मात्र असे असले तरी शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाच्या दृष्टीने सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
सर्व ११५ वॉर्डात लढणार महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी आमची तयारी सर्वच २९ प्रभागांमध्ये सुरू आहे. यंदा मुस्लिम प्रभागातही उमेदवार देणार आहोत. त्यादृष्टीने आमच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांची चाचपणी सुरू असून, महापालिकेत आमचीच सत्ता असेल.राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
१२ प्रभाग आज आमच्या ताब्यात भाजप-शिवसेनेने त्यांना हवे तशी प्रभाग रचना तयार करून घेतली आहे. मात्र असे असले तरी आमच्या ताब्यात आजच १२ प्रभाग असून, त्यातील सर्व ४८ नगरसेवक आजच विजयी झाले, असा विश्वास आहे. शिवाय, यंदा सर्व २९ प्रभाग लढण्याची तयारी आहे.-शारेक नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएम
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. यात प्रभागातील विकासकामे व तेथील समीकरणावर भर दिला जात असून, सध्या पक्षाकडून सर्व प्रभागांत चाचपणी सुरू करण्यात आली आहे. महायुतीचा निर्णय झाल्यास त्यात ठरल्याप्रमाणे जागा लढवल्या जाणार आहेत. तसेच पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या हस्ते लवकरच शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरू असून, शहरातील संघटन मजबुतीवर भर देत आहे. गणपती विसर्जनानंतर प्रत्येक प्रभागात निरीक्षक नियुक्त केले जाणार असून, कार्यकर्ते आणि नागरिकांचा अभिप्राय घेतल्यानंतर उमेदवार ठरणार आहे. तसेच आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नसून इतर पक्षांच्या समीकरणांचा विचार करून आघाडीच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांची भावना विचारत घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी सांगितले.
तयारी महायुतीची पण... आम्ही महापालिका निवडणुकीची तयारी ही महायुतीमध्येच लढण्याच्या दृष्टीने करीत आहोत. परंतु ऐनवेळी काही कारणाने स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्यादृष्टीने २९ पैकी १९ ते २० प्रभागांत पूर्ण ताकदीने तयारीत आहोत. त्यामुळे युती झाल्यास महापौर महायुतीचा असेल नसता आमचाच.-किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
महायुती असो नसो तयारी पूर्ण महापालिका निवडणूक महायुतीत लढायची की नाही, हे वरिष्ठ ठरवतील. तूर्तास आमची तयारी सर्व २९ प्रभागांमध्ये पूर्ण आहे. आतापर्यंत प्रतिकूल वातावरणात लढलो असून, यंदा अनुकूल परिस्थिती असल्याने महापौर आमचाच होणार.-राजेंद्र जंजाळ, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)