Sambhajinagar News : पावसाने ओढ दिल्याने फळबागा धोक्यात file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पावसाने ओढ दिल्याने फळबागा धोक्यात

सोयगाव तालुक्यात टँकरद्वारे विकतचे पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

पुढारी वृत्तसेवा

Orchards at risk due to lack of rain

जरंडी, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये फळबागाची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. मोसंबी, केळी, पेरू, पपई, आदी उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील फळबागा धोक्यात आल्या असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरद्वारे विकतचे पाणी देण्याची वेळ आली आहे. सोयगाव परिसरात फळबागांसह खरीप हंगामही संकटात आल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.

सोयगाव तालुक्यातील सोयगाव, कंकराळा, जरंडी, धिंगापूर, गलवाडा, निंबायती, बहुलखेडा, घोसला, तिडका, बनोटी, गोंदेगाव, किन्ही, वडगाव, शिंदोल आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी, मोसंबीच्या फळबागा आहेत. शेतकऱ्यांनी एप्रिल, मे महिन्यापासून बागेला ताण दिला होता. मात्र, जून महिना अर्धा झाला, तरी पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोसंबी बागेला अधिकचा ताण बसला असून, मोसंबी बागा आता धोक्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाद्वारे संत्री बागेला पाणी देणे अशक्य आहे. काही ठिकाणी फळबागा जळू लागल्या आहेत. काही शेतकरी विकतच्या पाण्यावर फळबागा जगवण्याची धडपड करीत आहेत. मात्र, पावसाने आणखी ओढ दिल्यास फळबाग उत्पादकांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे.

जरंडी-निंबायती पट्टयात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. पावसाने ओढ दिल्याने मोसंबी, पेरू बागेला अधिकचा ताण बसला आहे. त्यामुळे फळबागा जळू लागल्या असून, विकतच्या पाण्यावर बागा जगवण्याचे आव्हान उभे आहे. फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.
राजू तोताराम पाटील, शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT