Operation theatre in Mini Ghati closed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मिनी घाटी येथील सर्जरी विभागाचे ऑपरेशन थिएटर मागील सहा दिवसांपासून बंद असल्याने छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत असून, ही परिस्थिती त्यांच्यासाठी अक्षरशः जीवघेणी ठरत आहे. यांसह उपचारासाठी दररोज रुग्णालयात येणाऱ्या शेकडो रुग्णांची वेदना आणि चिंता दिवसेंदिवस वाढत असल्याने नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात म्हणजेच मिनी घाटीत स्त्री रोग शस्त्रक्रिया थिएटर, अर्थ, सर्जरी आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ४ ऑपरेशन थिएटर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एक ऑपरेशन थिएटरचा निर्जंतुकीकरण अहवाल नकारात्मक आल्याने तेथे होणाऱ्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या.
त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊनही ऑपरेशन थिएटर बंद आहे. गेल्या सहा दिवसांपासून ऑपरेशन थिएटर बंद असल्याने शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. परिणामी रुग्णांना नाइलाजाने घाटी किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, ऑपरेशन थिएटरचे काम सुरू असून कोणत्याही शस्त्रक्रिया ठप्प नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही
रुग्णालयात मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सोईनुसार शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. एक ऑपरेशन थिएटरचा निर्जंतुकरण अहवाल नकारात्मक होता, त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. रुग्णाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.