'Operation Shodh-4' achieves major success; 17 missing children safely reunited with their families!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरातील रिकामी खोली, जेवणाच्या ताटाकडे लागलेली नजर आणि प्रत्येक फोनच्या रिंगवर वाढणारी धडधड... हरवलेल्या लेकराच्या प्रतीक्षेत जागून काढलेल्या रात्री संपल्या असून, 'ऑपरेशन शोध-४' च्या माध्यमातून तब्बल १७ कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा सूर्य उगवला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम राबवत बेपत्ता झालेल्या १३ मुली आणि ४ मुले अशा एकूण १७ बालकांना सुखरूप शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करत संवेदनशील कामगिरी बजावली आहे.
राज्यात अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी ८ ते २३ जून २०२६ या कालावधीत 'ऑपरेशन शोध-४' मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम केवळ बेपत्ता बालकांचा शोध घेण्यापुरती मर्यादित नव्हती, तर तुटलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आणण्याची, पालकांच्या डोळ्यांतील अश्रूना आनंदाश्रूमध्ये बदलण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी आणि रेल्वे-बसस्थानकांवरील शोधाच्या माध्यमातून या बालकांचा अखेर शोधून काढले.
ही मोहीम पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सरला गाडेकर, वैभव रणखांब, समाधान पवार, उपनिरीक्षक गणेश काळे, मनोज पाटील, सचिन क्षीरसागर, विश्वजित फरताडे, ज्ञानेश्वर कायंदे, दगड्डू तडवी, दीपक पारथे, विनोद भालेराव, स्वप्नील नरवडे, गणेश वाघ, मनेश जाधव आणि अंमलदार शरद पवार, जाकेर शेख, कपिल बनकर, भाग्यश्री चव्हाण यांनी पूर्ण केली.
घर का सोडले?
सापडलेल्या १७ बालकांपैकी बहुतांश मुलांनी अत्यंत किरकोळ किंवा भावनिक कारणांतून घर सोडल्याचे निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावरील आभासी नाती आणि प्रेमाच्या गोड आश्वासनांना बळी पडून तब्बल ११ मुलींनी घर सोडले होते. तर २ मुलींनी रागाच्या भरात, ३ मुलांनी 'मोठे शहर' पाहण्याच्या वेडातून आणि एका मुलाने आई-वडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून घर सोडल्याचे तपासात उघड झाले.
पालकांनो, मुलांशी संवाद साधा "घरातून गेलेले प्रत्येक मूल पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत आणणे, हाच आमचा सर्वांत मोठा आनंद आहे. 'ऑपरेशन शोध-४' मध्ये मिळालेले हे यश म्हणजे कुटुंबाच्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम आहे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या भावनिक बदलांकडे लक्ष द्यावे, मित्र परिवार व सोशल मीडिया वापराबाबत जागरूक राहावे."प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक