Sillod News : सिल्लोड तालुक्यात रबीची पेरणी अवघी साडेतीन टक्के ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : सिल्लोड तालुक्यात रबीची पेरणी अवघी साडेतीन टक्के !

दुष्काळी परिस्थितीचा फटका; तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा, १२ गावांचे प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

Only 3.5 percent of the Rabi crop has been sown in Sillod taluka!

राजू वैष्णव

सिल्लोड : तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका रबी हंगामाला बसला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गतवर्षी ७१ हजार ८८९ हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. यंदा मात्र अवघ्या ३ हजार ५६४ हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण केवळ ३.५ टक्के आहे. त्यामुळे हिवाळ्यात हिरवेगार दिसणाऱ्या शेतशिवारात यंदा उन्हाळ्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे.

गतवर्षी वरुणराजाच्या कृपेने तालुक्यात रबीची ७१ टक्के पेरणी झाली होती. हरभरा, गहू, उन्हाळी मका आणि ज्वारीच्या पिकांनी शेतशिवार बहरले होते. यंदा मात्र अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. परिणामी खरीप पिकांचे नुकसान झाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. केळगाव, खेळणा आणि चारनेर पेंडगाव प्रकल्पांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा असल्याने मोजक्या भागांत रबीची पेरणी झाली. यंदा गव्हाचा पेरा पूर्णपणे शून्य आहे.

गतवर्षी तालुक्यात २७ हजार ६९८ हेक्टरवर हरभरा, २४ हजार ८४५ हेक्टरवर गहू आणि १७ हजार ५५५ हेक्टरवर उन्हाळी मक्याची पेरणी झाली होती. यंदा मात्र हरभऱ्याचे क्षेत्र अवघे १०५ हेक्टर, तर ज्वारीचे ३८१ हेक्टर आहे. गहू आणि मक्याची पेरणी झालेली नाही.

पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला, तर नदी-नाले आणि जलसाठे कोरडे पडल्याने रबी हंगामही संकटात सापडला आहे. शेतीवर केलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतीत काम नसल्याने शेतमजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी शेतमालाचे उत्पादन झाले; मात्र भाव मिळाला नाही. यंदा उत्पादनच नसल्याने बाजारात शेतीमालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे बळीराजाची 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार' अशी अवस्था झाली आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर

दुष्काळी परिस्थितीमुळे हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. केळगाव, खेळणा आणि चारनेर-पेंडगाव प्रकल्प वगळता तालुक्यातील बहुतांश छोटे-मोठे जलसाठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे १२ गावांचे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. धोत्रा, पानवडोद खुर्द आणि डिग्रस या तीन गावांची तहान सध्या टँकरने भागवली जात आहे. तर टाकळी जिवरग, बाळापूर, खुल्लोड, अनाड, बोदवड, बोरगाव बाजार, वरखेडी-भायगाव आणि तलवाडा या गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT