Jayakwadi dam water level file photo
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi Dam : जायकवाडीत केवळ २९ टक्के पाणीसाठा

बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट

पुढारी वृत्तसेवा

Only 29% water storage in Jayakwadi

पैठण, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी नाथसागर धरणाची पाणी पातळी दररोजच्या वाढत्या बाष्पीभवनामुळे घटत चालली असून, जायकवाडी धरणातून दररोज पिण्यासह औद्योगिकीकरणासाठी केवळ 0.3 दलघमी पाण्याचा धरणातून उपसा केला जातो, मात्र धरणातून आज रोजी बाष्पीभवन 1.439 दलघमी होत आहे.

म्हणजेच पिण्यासह औद्योगिकीकरणाला पाच दिवस जेवढे पाणी लागते तेवढे पाण्याचे बाष्पीभवन एकाच दिवशी आज रोजी होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे.

आज रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी 29.28% टक्क्यांवर पोहोचली असून, धरणात जिवंत पाणीसाठा 635.586 दलघमी आहे. मागील वर्षी जायकवाडी धरणात 236.8422 टीएमसी पाणी आले होते. गोदावरी पात्रात 173 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. जून महिना सुरू होऊनही जायकवाडी धरणासह परिसरात पाऊस झाला नसल्यामुळे धरणात अद्यापपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे यावर्षी पाणी जपूनच वापरावे लागणार, असे चित्र आहे.

यंदा कमी पावसाचा अंदाज

यावर्षी सिंचनासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून 193.83 दलघमी पाणी सिंचनासाठी देण्यात आले, तर डाव्या कालव्यातून आठ हजार पाचशे 857.58 दलघमी पाणी सिंचनासाठी देण्यात आले . मागील वर्षीही आजच्या दिवशी जायकवाडी धरणात 29.38% पाणीसाठा शिल्लक होता, मात्र यावर्षी हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे आता सिंचनासाठीच्या 4 पाणी पाळी संपल्यामुळे सिंचनासाठी पाणीसोडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाऊस न पडल्यास पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित करावे लागणार आहे.

गाळ काढणे गरजेचे

जायकवाडी धरणाला नुकतेच पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत. 1975 ला जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली होती. सिंचन, पिण्याचे पाणी, औद्योगिक पाणीपुरवठ्यासह वीजनिर्मिती हे डोळ्यासमोर ठेवून या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे साठवण क्षमता घटली आहे. यामुळे वरच्या धरणातून आलेले पाणी मोठ्या प्रमाणावर गोदावरी पात्रात विसर्ग करावा लागत आहे. यामुळे येणाऱ्या काळात जायकवाडी धरणातील गाळ काढणे काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT