One and a half kilos of charas seized in Mukundwadi, gang of five including a woman arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात नशेखोरीचा गोरखधंदा तेजीत सुरू असून, पार्सलमधून तस्करी होत असल्याचे पुढारीने समोर आणले होते. त्यानंतर गुरुवारी एनडीपीएसने एक टोळी अटक करून ट्रॅव्हल्स जप्त केली होती. आता मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी (दि.३०) रात्री अंबिकानगरात छापा मारून तब्बल दीड किलो चरस जप्त केले आहे. अनेक वर्षांनंतर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मोहमद मुजममील मोहमद नजीर (२१), लोमान नोमन खान इरफान खान (२१, दोघे रा. रहेमान कॉलनी), मोहमद लईखुदिन मोहमद मिराजजोदिन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (१९, रा. कटकट गेट) आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन (४५, रा. अंबिकानगर, गल्ली क्र. ८) अशी आर-ोपींची नावे असल्याची माहिती एसीपी मनीष कल्याणकर यांनी रविवारी दिली. दरम्यान, आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबिकानगर येथे आरोपी महिला शेख सुलताना ही राठोड नामक व्यक्तीच्या घरात पहिल्या मजल्यावर ९ बाय १० च्या खोलीत भाड्याने राहते. ती रुग्णाची सुश्रुषाचे काम करते. तिचा मुलगा वाहन चालक म्हणून काम करतो. दरम्यान, तिच्या घरात अमली पदार्थांचा साठा असून, तो काही आरोपींना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी एपीआय संजय बहुरे, पीए सआय शिवाजी घोरपडे, जमादार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ यांच्या पथकाने फॉरेन्सिकच्या पथकासह छापा मारला. आत पाहणी केली तेव्हा पलंगाखाली पोलिसांनी मोठ्याप्रमाणात चरस मिळून आले. कारवाईत पोलिसांनी १ किलो ४३९ ग्रॅम चरस जप्त केले. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सुलताना हिला रविवारी दुपारी अटक करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक इंगोले यांनी सांगितले.
सध्या पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार, एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे यांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाया करत आहेत. त्यामुळे आरोपींनी किराडपुरा, बायजीपुरा हा भाग सोडून आता मुकुंदवाडीत भाड्याच्या खोलीतून नशेचा धंदा सुरू केल्याचे समोर आले आहे. यातील मोहमद मुजम्मिल हा जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तर हे सर्व जण पहिल्यांदाच एनडीपीएसच्या कारवाईत सापडले आहेत.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एमडी ड्रग्स पेडलरला सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून पकडले. रविवारी (दि.३१) रात्री उशिरा ही कारवाई मौलाना आझाद कॉलेजजवळ, होमगार्ड ऑफिसच्या बाजूला करण्यात आली. आमेर शेख सलीम (३६, शताब्दीनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १२ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी विशेष पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, जमादार राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी येऊन नमुने घेतले असून, रात्री उशिरापर्यंत या पावडरची तपासणी सुरू होती.
चरस घेणारे ग्राहक धनवान घरातीलच असून, यात मोठ्याप्रमाणात तरुणवर्ग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे चरस कोणाला विक्री करत होते? या टोळीचे पेडलर कोण? चरस कोठून आणले? याचा पोलिस तपास करत आहेत.