Now register for cotton purchase from home, farmers will benefit
बबन गायकवाड वाळूज : केंद्र शासनाने कापूस उत्पादकासाठी कपास किसान हे अॅप सुरू केले आहे. या अॅपवर १ ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या पिकाची शेतकऱ्यांना नोंद करता येणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या आपल्या मोबाईलव्दारे शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी नोंदणी करणे सहज शक्य झाले आहे.
मागील हंगामाच्या सुरवातीला कापसाचे दर हमी दरापेक्षा कमी होते. म्हणजेच ७ हजार २५० इतका होता. परिणामी शेतकऱ्यांनी सीसीआयला हमीदराने कापूस विक्री करण्यास पंसती दिली होती. केंद्र शासनाने यंदा त्यात वाढ करून ८ हजार ११० रूपये केला आहे. कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे सुलभ व्हावे. यासाठी सीसीआयने कपास किसान हे अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शेतकरी नक्कीच समाधानी होईल. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना किमान आधारभुत किंमत योजनेतंर्गत कापूस विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोंदणी करण्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यात ई-पीक पाहणी बंधनकारक, सातबारा उताऱ्यावर कापसाची नोंद आवश्यक, खरेदीचे सर्व पेमेंट आधार लिंक खात्यावर जमा होईल, त्यासाठी बँक खात्याला आधारलिंक आवश्यक आहे. आधार कार्डला आपला मोबाईल क्रंमाक लिंक आवश्यक आहे.
कपास किसान हे अॅप डाऊडलोन करून त्यात आपला मोबाईल क्रंमाक टाकावा. आलेल्या ओटीपीने खात्री करून घ्यावी. नोंदणी करतांना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रंमाक, बँक खाते माहीती, खाते क्रमाक, आयएफसी कोड क्रंमाक, सातबारासह आधार कार्ड माहीती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात डिजिटल सुविधांचा अभाव असल्याने अनेकांना नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. शासनाने त्या-त्या गावात ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तात्काळ नोंदणीचा निर्णय होत असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. शेतकऱ्यांनी कुणावरही अवलंबून न राहता कपास किसान अॅपवर आपल्या पिकाची नोंदणी करून वाढीव दराचा लाभ घ्यावा.अर्चना सुकासे, सभापती कृ.उ.बा.
अॅपमुळे नोंदणी सोपी झाली आहे. योग्य भाव, वेळेवर पेमेंट मिळणार असल्याने नक्कीच शेतकरीवर्ग समाधानी राहील.सचिन काकडे, उपसभापती