छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेने काही दिवसांपासून शहरात रस्ते रुंदीकरणाची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्याच धर्तीवर आता छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील दहा प्रमुख रस्तेही अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसीसह संबंधित यंत्रणांकडून रस्त्यांच्या मार्किंगचे काम सुरू आहे. मार्किंगमध्ये येणाऱ्या मालमत्ता पाडण्यासाठी महापालिकेची मदत घेण्याचे प्राधिकरणाने ठरविले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या पाच तालुक्यांतील ३१३ गावांचा महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समावेश होतो. हा संपूर्ण भाग शहराला लागून आहे. सध्या शहरात रस्त्याच्या जागेतील अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे प्राधिकरणानेही आपल्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गातील अतिक्रमणे हटवून ते रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आठवडाभरापूर्वी याबाबत बैठक घेतली.
त्यात त्यांनी प्रमुख दहा रस्त्यांच्या रुंदीबाबत मार्किंग करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आणि इतर संबंधित यंत्रणांना दिले. त्यानुसार सध्या मार्किंगचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी जेवढी जमीन संपादित केलेली आहे, त्यात येणारी अतिक्रमणे निश्चित केली जात आहेत. अतिक्रमणे पाडण्यासाठी प्राधिकरणाकडे स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे अतिक्रमण हटावसाठी महानगरपालिकेची मदत घेण्यात येणार आहे.
प्राधिकरणाच्या हद्दीतील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग अतिक्रमण मार्किंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, संबंधित यंत्रणांनी हे काम केले आहे. लवकरच या कामाचा आढावा घेतला जाईल. रस्त्यासाठी संपादित जमिनीत किती अतिक्रमणे आहेत हे यातून समोर येईल. अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेची मदत घ्यावी लागणार आहे, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले.
दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ रस्ता
केम्ब्रीज शाळा ते करमाड गाव (जालना रोड)
बाळापूर गाव ते पांढरी गाव (धुळे-सोलापूर रस्ता व बीड बायपास)
गेवराई ते कौडगाव (पैठण रस्ता)
छावणी हद्द ते रहिमपूर (छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता)
ए. एस. क्लब चौक ते रांजणगाव पोळ (घोटी रस्ता)
करोडी ते पाचपीरवाडी (धुळे-सोलापूर रस्ता)
ओहर ते ममनापूर (जटवाडा रस्ता)
सावंगी तलाव ते बिल्डा (जळगाव रस्ता)
सावंगी ते केम्ब्रीज शाळा राज्य महामार्ग २१७