Notorious gangster Tippa robbed a businessman with the fear of a sword
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांच्या नाकात दम आणणारा कुख्यात गुंड टिप्या ऊर्फ जावेद शेख याने जेलमधून बाहेर येताच त्याच्या टोळीने पुन्हा धुमाकूळ सुरू केला आहे. दारू पिताना हॉटेलात भेटलेल्या एका प्लॉटिंग व्यावसायिकाला निर्जनस्थळी नेले. तिथे पाच साथीदारांसह व्यावसायिकाच्या पोटाला तलवार लावून अडीच लाखांची रोकड मोपेडसह लुटून नेली. सकाळी आणखी एक लाख आणून दे, असे म्हणत धमकावले. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास बायपासवरील साईनगर भागात घडली.
टिप्या ऊर्फ जावेद शेख मकसूद शेख (रा. विजयनगर), अर्जुन पाटील (रा. राजे चौक), टग्या, बादशहा, भूषण आणि अनोळखी दोघे अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी शेख अजर शेख गणी (४०, रा. गारखेडा) हे प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास अजर हे त्यांचा मित्र अब्रार शेख हसन सोबत मोपेडने बीड बायपास भागातील हॉटेल स्पाईस ट्री येथे गेले होते. त्यांच्याकडे खिशात अडीच लाख रुपये होते. हॉटेलमध्ये अगोदरच अब्रारच्या ओळखीचा कुख्यात टिप्या आणि अर्जुन पाटील हे समोरच्या टेबलवर दारू पीत बसले होते.
टिप्याने अर्जुनच्या कानात काही तरी सांगून त्याला बाहेर काढून दिले. काही वेळाने अब्रार व टिप्यासह अजर हॉटेलच्या बाहेर आले. तेव्हा अजर स्वतःच्या मोपेडवर तर त्यांचा मित्र अब्रार टिप्याच्या मोपेडवर बसला. तेव्हा टिप्याने साईनगरकडे गाडी घेण्यास सांगितले. तिघेही साईनगरकडे डीपीजवळ वाळूच्या ढिगाऱ्याजवळ रात्री दहाच्या सुमारास आले. तिथे अगोदरच टिप्याच्या टोळीतील टग्या, बादशहा व अन्य दोन अनोळखी उभे होते. काही वेळ तिथे बसल्यानंतर टिप्याने अजरच्या कानशिलात मारली.
अजर आणि अब्रारला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. तुझ्या खिशातील पैसे मला दे, असे टिप्या म्हणाला. तेव्हा त्याला अजर यांनी नकार देताच टिप्याने फोन करून तलवार घेऊन येण्यास सांगितले. पाच मिनिटांत अर्जुन आणि भूषण तलवार घेऊन आले. टिप्याने तलवार अजरच्या पोटाजवळ लावून खिशातील अडीच लाख रुपये काढून घेतले. अजर आणि अब्रार पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना टिप्या, टग्या, बादशहा, अर्जुन, भूषण व इतर दोघांनी तलवारीचा धाक दाखवून दोघांना पकडून ठेवले.
१५ दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर
विधानसभा निवडणुकीच्या काळात एमपीडीएतून बाहेर पडताच जेलपासून आतषबाजी करत जंगी रॅली काढली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये सेव्हनहिल जवळील हॉटेल बंजारा येथे तरुणावर कोयते, चाकूने जीवघेणा हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी केले होते. त्याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्यावर मोक्काअंर्तगत कारवाई करून हसूल जेलमध्ये टाकले होते. तो १५ दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा त्याने टोळी सक्रिय करून धुमाकूळ घातला आहे.
मोक्कासह तीन वेळा एमपीडीए
कुख्यात टिप्या विरुद्ध खून, जीवघेणे हल्ले, लूटमार, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, अपहरण, विनयभंग, खंडणी, विनयभंग अशा गंभीर स्वरूपाचे विविध पोलिस ठाण्यांत २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. टिप्याला २०१९, २०२१ आणि २०२३ मध्ये एमपीडीए अंतर्गत कारवाई करून वर्षभरासाठी जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर टिप्याचे गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वेगाने वाढते. खंडणी, तलवार, शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून लूटमार सातत्याने तो करतो. २०२४ मध्ये पोलिस आयुक्तांनी मोक्का लावून त्याला पुन्हा हसूल जेलमध्ये टाकले होते.
गँगच्या सदस्यांची धरपकड सुरू
टिप्याच्या टोळीतील गुन्हेगारांची पुंडलिकनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांकडून रविवारी रात्री धरपकड सुरू होती. टिप्यासह आरोपी मोबाईल बंद करून पसार झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.
सकाळी आणखी एक लाख दिले नाही तर मर्डर
अडीच लाख घेतल्यानंतर टिप्याने सकाळपर्यंत आणखी एक लाख रुपये आणून देण्यास सांगितले. पैसे दिले नाही तर तुला जिवे मारेल, अशी अजरला धमकी दिली. अजरची मोपेड घेऊन टिप्या निघून गेला. जाताना त्याने एका आरोपीला अजरला घरी सोडण्यास सांगितले. त्याने जवाहरनगर पोलिस ठाण्याजवळ सोडले. त्यानंतर अर्जुनने दहा मिनिटांनी अब्रारला त्याच्याजवळ सोडले. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत अजर यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.