छत्रपती संभाजीनगर : मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातून जेलमधून सुटून बाहेर येताच कुख्यात गुन्हेगाराने शहरात पुन्हा लूटमार सुरू केल्याचे समोर आले आहे. चाकूचा धाक दाखवून स्विगी डिलिव्हरी बॉयला लुटणारा सराईत गुन्हेगार मुकेश ऊर्फ मुक्या साळवे आणि दुसऱ्या एका घटनेत व्हिडिओग्राफरची लाखांची कॅमेरा बॅग पळवणारा कार्तिक जाधव अशा दोन कुख्यात गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. या कारवाईत कॅमेरा आणि मोबाईल असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी शुक्रवारी (दि.१५) दिली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी चेतन सोमेश जैस्वाल हा बीड बायपास रोडवरील तिरंगा हॉटेलजवळ थांबलेला असताना त्याची कॅमेरा बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली होती. १ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी (दि. १५) गस्तीवर असताना, आरोपी कार्तिक जाधव त्यांच्या हाती लागला.
त्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार शंकर शेलार आणि एका अल्पवयीन मुलाच्या (विधी संघर्ष बालक) मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन व्हिडिओ शूटिंग कॅमेरे, बॅटरी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणातील आरोपी शंकर शेलार अद्याप फरार आहे. ही दुहेरी कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उप आयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्य मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, जगन्नाथ मेनकुदळे, राजेंद्र साळुंके, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे मनोहर गिते, विक्रम खंडागळे, शोन पवार, सुनील जाधव आदींच्या पथकाने केली.
२० दिवसांपूर्वीच जेलमधून आला बाहेर
जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्विगी डिलिव्हरी बॉय नंदकिशोर कुंजर यांना ८ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास रस्त्यात अडवून, चाकूचा धाक दाखवत त्यांचा मोबाईल हिसकावण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने मुकुंदवाडी भागातील कुख्यात गुन्हेगार मुकेश ऊर्फ मुक्या महेंद्र साळवे (२६, रा. स्मशानभूमीजवळ, मुकुंदवाडी) याला ताब्यात घेतले.
मुकेश हा कुख्यात गुन्हेगार असून तो टोळी चालवितो. गेल्या वर्षीच पोलिस आयुक्तांनी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. त्याला मुंबईच्या जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. २० दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा लूटमार सुरू केल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलिस ठाण्यात १६ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.