No case registered in the Devasthan (temple trust) land plotting matter
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जळगाव रोडवरील जाधववाडी बाजार समितीसमोरील श्रीराम मंदिर संस्थान तथा बालाजी मठाच्या वर्ग-२ मधील ४१ एकर देवस्थान जमिनीवरील बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ३० सप्टेंबर रोजी कारवाई करून प्लॉटिंग उद्ध्वस्त केली. या कारवाईनंतर अद्यापही याप्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे अधिकारी संबंधित पोलिस ठाण्यात दिवसभर ठाण मांडून आहेत. तरीही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिका आणि पोलिस यंत्रणा नेमक्या कोणाच्या दबावाखाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जाधववाडी बाजार समितीसमोरील देवस्थानच्या या ४१ एकर जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून बेकायदा प्लॉटिंगचा व्यवहार सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष गेले नसल्याचा आरोप होत आहे. श्री रामानंद बिल्डरचे मुकुंद कुलकर्णी यांनी या जमिनीवर प्लॉटिंग करून भूखंडांची बाँडवर विक्री केल्याचे सांगितले जात आहे. हे भूखंड प्रतिचौरस फूट ५ ते ७ हजार रुपये दराने विकण्यात आले असून, यापैकी सुमारे ८० ते ८५ टक्के भूखंडांची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच भूखंड खरेदीदारांना जमिनीचा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये बदल करून देणे, त्यानंतर बिगरशेती (एनए) परवानगी मिळविणे आणि पुढे रजिस्ट्री करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या जमिनीच्या वर्गबदलासाठी महसूल विभागाकडे फाईलही दाखल करण्यात आली होती. मात्र, सत्र, तडजोड न झाल्याने ही फाईल शासन स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, या प्लॉटिंगसाठी महापालिकेकडेही परवानगी मिळविण्याचा अर्ज करण्यात आला होता. मात्र, आवश्यक परवानगी नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ३० सप्टेंबर रोजी कारवाई करून प्लॉटिंग उद्ध्वस्त केली. एरवी कारवाईनंतर गुन्हा दाखल करणाऱ्या महापालिकेला यावेळी १५ दिवसांपासून पाठपुरावा करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मनपाचे अधिकारी दिवसभर संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित असूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र असल्याने महापालिका आणि पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल करू
कोणीही अनधिकृत प्लॉटिंग केली असल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणारच आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असेल, तर याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा केली जाईल. कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला आईल.