छत्रपती संभाजीनगर : शहरातील ज्या नो नेटवर्क भागांमध्ये नवे जलकुंभ बांधून कार्यान्वित होण्यास सज्ज आहेत. त्या भागातील नागरी वसाहतींमध्ये अंतर्गत जलवाहिन्या टाकून मालमत्तांना नळ कनेक्शन देण्यात यावेत, असे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजेपी) देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
शहराला नव्या २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव पाणी देण्याची प्रक्रिया एमजेपीने सुरू केली आहे. यात पहिल्यांदा ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू केल्याने १८ एमएलडी पाणी वाढले आहेत. तर नव्या २५०० च्या जलवाहिनीतून पहिल्या दिवशी ७.५० एमएलडी पाणी वाढले आहे. त्यानुसार मागील चार दिवसांमध्येच शहरात सुमारे २५.५० एमएलडी वाढीव पाणी येत आहे.
हे वाढीव पाणी सध्या महापालिकेच्या जुन्या पाणी वितरणाच्या जलवाहिन्यांमधूनच शहरात पोहोचविले जात आहे. १२ जूनपासून नवीन योजनेतील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी सुरू करून हसूल जटवाडापर्यंत नवीन योजनेचे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अमोल येडगे म्हणाले की, नव्या योजनेच्या पाण्यातून नो नेटवर्क भागांच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेला बांधकाम होऊन पाणीपुरवठ्यासाठी सज्ज असलेले १९ नवे जलकुंभ मिळणार आहेत. त्यातून १५०० आणि २००० मि.मी. व्यासाच्या नव्या जलवाहिन्यांद्वारे नक्षत्रवाडीहून शहरात पाणी आणले जाणार आहेत. त्यासाठी गॅप जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातील नव्या जलकुंभापैकी १० जलकुंभ हे नो नेटवर्क भागात मोडते. त्यामुळे या भागांमध्ये आता अंतर्गत पाणीवितरण वाहिन्या टाकण्यासोबतच वसाहतींमधील मालमत्तांना नळ कनेक्शन देण्याचे निर्देश एमजेपीला दिले आहेत.
शहरात दाखल होणाऱ्या वाढीव पाण्यानुसार सध्या वसाहतींना वितरणाचे नियोजन सुरू आहे. ज्या भागात पाणीपुरवठा १० दिवसांआड होतो. तेथे किमान ३ दिवसांच्या गॅप कमी करणे. तसेच जेथे ७ दिवसांआड पुरवठा होतो. तेथे दोन दिवसांनी गॅप कमी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
नो नेटवर्कमधील जलकुंभ
गरवारे स्टेडियम (मिसारवाडी), हसूल, हरसिद्धी, हरीओम नगर, नारेगाव, सुधाकरनगर, आमेरनगर, नक्षत्रवाडी, शाक्यनगर, एजीपी पब्लिक स्कूल