New ST buses available for student trips
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थी सहलीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ५० टक्के सवलतीत बस उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी विद्यार्थी सहलीसाठी नव्या कोऱ्या लालपरी देण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याने यावर्षी सहलीला चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षी शैक्षणिक सहलीतून एसटीला सुमारे ३ कोटी ९५ लाखांपेक्षाही जास्त असे सुमारे ४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. शैक्षणिक सहलीसाठी मुख्याध्यापकांनी संपर्क साधवा जेणेकरून नियोजन करता येईल, असे आवाहन विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी केले.
शैक्षणिक सहलीसाठी लालपरी उपलब्ध करून देण्यात येते. दरम्यान, यावर्षी नव्या कोऱ्या लालपरी देण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याने याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता एसटीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीत ही सुविधा उपलब्ध असल्याने नव्या लालपरीतही ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी अनेक शाळा एसटीच्या बसलाच प्रथम प्राधान्य देतात. त्यामुळे दरवर्षी शैक्षणिक सहलीसाठी चांगला प्रतिसाद मिळतो. नोव्हेंबरपासून शैक्षणिक सहलीला सुरुवात होते. त्या त्या शाळेच्या व्यवस्थापन निर्णयानुसार सहलीचे नियोजन करण्यात येते. तसे नियोजन असल्यास मुख्याध्यापकांनी एसटीशी संपर्क साधण्याचे आवाहन नेहूल यांनी केले आहे.
गतवर्षी ४ कोटींचे उत्पन्न
गतवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत विविध शाळांकडून विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीसाठी लालपरीची मागणी केली होती. या दरम्यान ८८० लालपरी बुक झाल्या होत्या. या लालपरीने सुमारे ७लाख ९० हजारांचे अंतर पार करत ३ कोटी ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. हे उत्पन्न ५० टक्के सवलतीतून मिळाले आहे.