विधिवत पूजनानंतर ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषात पवित्र रांजण भरण्याच्या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Nath Shashti Yatra 2026 | नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ; पूजनानंतर ‘भानुदास-एकनाथ’ जयघोषात रांजण भरण्यास सुरुवात

विधिवत पूजनानंतर ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषात पवित्र रांजण भरण्याच्या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Paithan Sant Eknath Maharaj

पैठण : “द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाही हरी कावडीने” या अभंगातील भावनेला साक्षी ठेवत पैठण नगरीत संतश्रेष्ठ श्रीसंत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या नाथषष्ठी यात्रा सोहळ्याला गुरुवारी (दि. ५) हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात औपचारिक प्रारंभ झाला. विधिवत पूजनानंतर ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषात पवित्र रांजण भरण्याच्या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

परंपरेनुसार श्रीसंत एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात पांडुरंगाने श्रीखंड्या रूप धारण करून बारा वर्षे कावडीने पाणी आणून सेवा केल्याची श्रद्धा आहे. त्या स्मरणार्थ तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर पवित्र रांजणाचे पूजन केले जाते. फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत तीन दिवस भाविकांकडून गोदावरीचे पवित्र जल या रांजणात अर्पण केले जाते.

गुरुवारी सकाळी श्रीसंत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील मंदिरात नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले व रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते पवित्र रांजणाचे विधिवत पूजन करण्यात आले. या पूजनाचा पौरोहित्य वे. शा. स. चंद्रशेखर उपाध्ये, रवींद्र साळजोशी, उत्तम सेवनकर, मनोज शुक्ल, खरे गुरु, पोपट गुरु व प्रकाश नाईक यांनी केले.

परंपरेनुसार ज्या भाविकाच्या घागरीतील गोदावरीचे पवित्र जल टाकल्यानंतर रांजण भरतो, त्या भाविकामध्ये पांडुरंगाचे रूप मानले जाते. त्या भाविकाचा नाथांच्या घराण्याकडून शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान करण्याची प्रथा आहे.

या सोहळ्याला नाथवंशज ज्ञानेशबुवा महाराज गोसावी पालखीवाले, योगेशबुवा महाराज गोसावी पालखीवाले, रवींद्र पांडव, सचिन पांडव, श्रीकृष्ण कुलकर्णी, पुष्कर महाराज गोसावी, अथर्व पांडव, चंद्रशेखर कुलकर्णी, अनिल जोशी यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवित्र रांजण पूजन व महाआरतीनंतर गोदावरीचे जल असलेली मानाची घागर सुप्रियाताई गोसावी, उल्काताई गोसावी पालखीवाले, माधुरी पांडव, अपूर्वा पालखीवाले आणि सुवर्णाताई उपाध्ये यांनी रांजणात अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT