Naregaon, Budhilane police bust drug smugglers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तरुण पिढीला नशेच्या खाईत लोटून नशेचा बाजार करणाऱ्या ड्रग्स तस्करांच्या टोळीची पोलिसांनी हातकडी घालून नारेगाव, बलूच गल्ली, बुढीलेन भागात शुक्रवारी (दि.५) धिंड काढली. येथेच्छ प्रसाद भेटला, आरोपी हात जोडून भररस्त्यात गुडघ्यावर बसले. ढसाढसा रडले. आरोपींची धिंड पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
इंदौरहून आणलेले दीड किलो चरस मुकुंदवाडीत जप्त करून महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपी मोहमद मुजममील मोहमद नजीर (२१), लोमान नोमन खान इरफान खान (२१, दोघे रा. रहेमान कॉलनी), मोहमद लईखुदिन मोहमद मिराजजोदिन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (१९, रा. कटकट गेट) यांच्यासह सिटी चौक पोलिसांनी आझाद कॉलेजच्या मागच्या गेटजवळ पकडलेला एमडी ड्रग्स पेडलर आमेर शेख सलीम (३६, शत-ाब्दीनगर) या पाच जणांची येथेच्छ प्रसाद देऊन धिंड काढली.
शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांसह त्यांना जागा देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. मोक्का, एमपीडीएच्या कारवाया वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय दिलीप चंदन, विनायक शेळके, एनडीपीएसचे पीएसआय अमोल म्हस्के, अंमलदार संदीप धर्मे, महेश उगले, नितेश सुंदर्डे, विजय त्रिभुवन, छाया लांडगे, सतीश जाधव, मुकुंदवाडी पोलिस, सिटी चौक पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांनी आरोपीना दुपारी एकच्या सुमारास नारेगावात फिरविले. तेथून काही वेळाने बुढीलेन भागात आमेरची धिंड काढण्यात आली. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
धिंड सुरू असताना आरोपी खाली मान घालून चालत होते. ज्या भागात दहशत केली. तिथेच धिंड निघाल्याने अक्षरशः रडत होते. गर्दीकडे हात जोडून मी पुन्हा कधी ड्रग्स विकणार नाही, असे म्हणत होते. हे पाहून नागरिकांनीही चांगली अद्दल घडवली पाहिजे, पिढ्या बरबाद करत असल्याचे म्हणत आरोपींवर संताप व्यक्त केला.
नारेगाव बलूच गल्लीत गांजा व अमली पदार्थ विक्री सर्रासपणे सुरू असते हे आजवर अनेक कारवायांवरून समोर आले. या आरोपींनीही या भागात काही जणांना चरस, ड्रग्स विक्री केल्याचा संशय आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपींकडे गल्लीतील कोणाला ड्रग्स दिले, अशी विचारणा केली. त्याचवेळी एक रेकॉर्डवरील तिथे घुटमळत होता. त्याला पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दम देताच त्याने तेथून धूम ठोकली.
कुख्यात गुन्हेगार, अमली पदार्थ विक्रेते, तस्करांना जागा देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. मोक्का, एमपीडीएच्या कारवाया वाढविण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांची ज्या भागात दहशत, माज केला तिथेच धिंड काढली जात असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. कुख्यात टिप्याही याच धाकाने न्यायालयात हजर झाला.