छत्रपती संभाजीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट देणार आहेत. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे ते दर्शन घेतील. या स्मृतिमंदिराच्या उभारणीत छत्रपती संभाजीनगरचे योगदान राहिले असून उभारणीसाठी लागणारा दगड हा जिल्ह्यातील तलवाडा (ता. वैजापूर) येथील खाणीतून नेण्यात आला होता अशी नोंद संघाच्या दस्ताऐवजात आहे.
स्मृतिमंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची येथे समाधी आहे. १९४० साली डॉ. हेडगेवार यांचे निधन झाल्यावर नागपुरातील रेशीमबाग परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तेथे डॉक्टरांची समाधी बांधण्याचा निर्णय झाला. ९ एप्रिल १९६२ रोजी गोळवलकर गुरुजींच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिमंदिराचे लोकार्पण झाले. गुरुजींच्या निधनानंतरही त्यांची समाधी परिसरातच करण्यात आली. या दोन्ही स्थळांना नागपुरात स्वयंसेवक भेटी देत असतात. संघाच्या तृतीय वर्षासाठी येणा-या स्वयंसेवकांना स्मृतिमंदिर प्रेरणा देते. याशिवाय गेल्या काही वर्षापासून नागपूर विधानसभा अधिवेशनासाठी येणा-या भाजप आमदारांना स्मृतिमंदिरात दर्शनासाठी नेले जाते.
या स्मृतिमंदिराच्या कामासाठी लागणारा दगड संभाजीनगर जिल्ह्यातून तलवाडा येथील खाणीतून पाठविण्यात आला. याबाबतची नोंद 'संघसरिता' या ग्रंथात आहे. संघाचे दिवंगत कार्यकर्ते अॕड. मधुकरराव गोसावी यांनी त्यांच्या संघकामाच्या आठवणी लिहिल्या आहेत. ते लिहितात, तलवाडा येथे दगडाची खाण आहे. या खाणीवर विस्तारक म्हणून गेलो. आता दगडाच्या खाणीवर विस्तारक कसा काय असा प्रश्न पडेल? नागपूरला डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिमंदिराचे काम सुरु होते. तेथे लागणारे दगड काही प्रमाणात तलवाडा येथील खाणीतून पाठविले जात. खाणीतून काढलेला दगड घडविल्यानंतर तो ट्रकमधून नांदगाव येथे आणला जाई. तेथून रेल्वेने नागपूरला पाठविला जात असे. अनंतराव गोगटे या कामावर देखरेख ठेवत. श्रीकृष्ण दांडेकर यांनी एका लेखात याबाबत आठवण नमूद केली आहे.
संघविचाराचे पत्रकार विराग पाचपोर यांनी तलवाड्यातून दगड आणल्याचा उल्लेख 'आॕर्गनायझर'मध्ये केला आहे. मुंबईतील वास्तुविशारद दीक्षित यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावर बराच विचार केल्यानंतर, त्यांनी १९५६ च्या ऑक्टोबरमध्ये स्मृती मंदिराचे रेखाचित्र तयार केले आणि पाच गोष्टी निश्चित केल्या. त्या अशा - मूळ समाधीत बदल होणार नाही, समाधीचे रक्षण करण्यासाठी खोली बांधावी व त्यावर डॉ. हेडगेवारांचा पुतळा असावा, बांधकाम दगडांनी करावे, सुशोभीकरणावर वाजवी खर्च असावा, वास्तुकला भारतीय आणि बांधकामात स्वदेशी साहित्य असावे.
स्मृतिमंदिरात पहिल्या मजल्याचे काम करताना मात्र जोधपूरहून वाळूचा दगड वापरण्यात आला. मोरोपंत पिंगळे, पांडुरंग क्षिरसागर, मेजर अहिरराव, मनोहर पवार, वसंतराव जोशी ही मंडळी कामावर लक्ष देत असत. मुंबईचे प्रसिध्द शिल्पकार नानाभाई गोरेगावकर यांनी डॉ. हेडगेवार यांचा पुतळा बनविला. २०१७ साली एमटीडीसीने स्मृतिमंदिराला पर्यटनाचा दर्जा दिला आहे.